सावंतवाडीत ‘धर्मवीर’ आनंद दिघेंना भावपूर्ण अभिवादन! ; आ. केसरकर यांच्या कार्यालयात शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमला!

सावंतवाडी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसैनिकांच्या हृदयातील अढळ स्थान असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडीत त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ येथील संपर्क कार्यालयात आयोजित या अभिवादन कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कडतरकर यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यानंतर माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. दिघे यांच्या कार्याचा आणि शिवसेनेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

“छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “धर्मवीर आनंद दिघे अमर रहे”, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे” अशा जयघोषांनी यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. घोषणांमधून शिवसैनिकांच्या मनातील दिघे यांच्या कार्याविषयीची निष्ठा आणि आदरभाव प्रकर्षाने जाणवत होता.

या अभिवादन सभेला शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, माजी नगरसेविका भारती मोरे, सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, विश्वास घाग, संदेश सोनुर्लेकर, गुंडू जाधव, कृष्णा लाखे, लतिका सिंग, सायली होडावडेकर, संजय मांजरेकर, महेश शिरोडकर, एकनाथ हळदणकर, सुभाष गावडे, सुप्रीता धारणकर, सुनील नाईक, सुरेश सावंत, संजय माजगावकर आणि भारती परब यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना उजाळा देत सावंतवाडीत शिवसैनिकांनी एकजुटीचा आणि निष्ठेचा जागर केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles