सावंतवाडी : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या बाजारपेठेतील जागावाटपात स्थानिक फळ, फूल, भाजी विक्रेते तसेच स्थानिक व्यावसायिकांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी केली आहे. स्थानिकांच्या हक्काच्या जागांवर परप्रांतीय विक्रेत्यांची मक्तेदारी अथवा मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला.
गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक असून, या काळात सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होते. गणेशमूर्ती सजावटीचे साहित्य, फळे, फुले, भाजीपाला तसेच विविध वस्तूंच्या विक्रीसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने परप्रांतीय विक्रेते शहरात दाखल होतात. मात्र, मोठ्या प्रमाणावर जागा अडवून ठेवण्याच्या प्रकारामुळे स्थानिक विक्रेते आणि छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही, अशी तक्रार सुभेदार यांनी केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाकडून दरवर्षी भाजी, फळे व फूल विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागांचे नियोजन केले जाते. मात्र, प्रत्यक्ष जागावाटपात स्थानिक विक्रेते आणि व्यावसायिकांच्या वाट्याला तुलनेने कमी जागा येत असल्याने ‘स्थानिकांच्या शहरात स्थानिकांवरच अन्याय’ होत असल्याचा आरोप सुभेदार यांनी केला.
यंदाच्या गणेशोत्सवात ही परिस्थिती बदलली पाहिजे. स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेऊन जागावाटपात त्यांना स्पष्टपणे प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना जागा देताना स्थानिकांचा हक्क आणि व्यवसायाची संधी हिरावली जाणार नाही, याची दक्षता नगरपालिका प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी स्वतः लक्ष घालून गणेशोत्सवातील बाजारपेठेचे नियोजन करावे आणि स्थानिक विक्रेते, व्यापारी व व्यावसायिकांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी सुभेदार यांनी केली.
दरम्यान, स्थानिकांच्या मागणीची दखल घेतली नाही आणि जागावाटपात पुन्हा स्थानिकांवर अन्याय झाला, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला घेराव घालण्यात येईल, असा आक्रमक इशारा आशिष सुभेदार यांनी दिला आहे.



