रस्ता द्या, नाहीतर उपोषण अटळ! – नेमळे धनगरवाडी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीला इशारा! ; नमुना क्र. २३ मध्ये नोंद नसल्याने रस्ता विकासापासून वंचित.

सावंतवाडी : पिढ्यानपिढ्या वापरात असलेला रस्ता ग्रामपंचायत नमुना क्र. २३ मध्ये अद्याप नोंदविला गेला नसल्याने नेमळे गावकर-कुंभारवाडी ते धनगरवाडी रस्त्याचा विकास रखडला आहे. खड्डेमय आणि धोकादायक झालेल्या या रस्त्याच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा महिला, मुले आणि ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा धनगरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

गावकर-कुंभारवाडीमधून धनगरवाडी वस्तीकडे जाणारा हा रस्ता शाळकरी मुले, शेतकरी, ग्रामस्थ तसेच पाळीव जनावरांच्या दैनंदिन ये-जा करण्याचा प्रमुख मार्ग आहे. मात्र, वर्षानुवर्षे या रस्त्याची कोणतीही ठोस डागडुजी अथवा सुधारणा झालेली नसल्याने सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून चालणेही धोकादायक झाले असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

२०२२ मध्ये निवेदन, तरीही पाठपुरावा नाही!

धनगर समाजाच्या मूलभूत गरजांचे निराकरण करण्यासंदर्भात ४ मे २०२२ रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत धनगरवाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी भूसंपादन करून रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. हे निवेदन नेमळे ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाले होते. मात्र, त्यानंतर ग्रामपंचायतीकडून या विषयाचा अपेक्षित पाठपुरावा झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

परिणामी, आजतागायत गावकर-कुंभारवाडीमधून धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची ग्रामपंचायत नमुना क्र. २३ मध्ये नोंद झालेली नाही. नोंदच नसल्याने रस्त्याच्या विकासकामांना अडथळा निर्माण होत असून धनगर समाजाला मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

‘आता आश्वासन नको, प्रत्यक्ष कार्यवाही हवी!’

रस्त्याची नमुना क्र. २३ मध्ये तातडीने नोंद करून त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी धनगरवाडी ग्रामस्थांनी केली आहे. पिढ्यानपिढ्या वापरात असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कार्यवाही हवी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी नेमळे ग्रामपंचायतीला निवेदन देऊन रस्त्याची तातडीने नोंद न झाल्यास महिला, लहान मुले आणि सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

रस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणाऱ्या प्रशासनाविरोधात धनगरवाडी ग्रामस्थांचा आता एल्गार; ग्रामपंचायत प्रशासन या इशाऱ्यानंतर तरी जागे होणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles