सावंतवाडी : विवाहानंतर महिलेच्या आयुष्यात नवे नाते, नवे घर आणि नवे पर्व सुरू होते; मात्र या नव्या पर्वाच्या नोंदी करताना तिच्या माहेरच्या नावावरच प्रश्नचिन्ह उभे राहू नये, अशी मागणी आता पुढे आली आहे. विवाह नोंदणीच्या दाखल्यावर महिलेचे लग्नापूर्वीचे माहेरचे नाव आणि लग्नानंतरचे सासरचे नाव अशा दोन्ही नावांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा, अशी आग्रही मागणी ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.
सध्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका स्तरावर विवाह नोंदणी करताना अनेक ठिकाणी महिलेच्या केवळ लग्नानंतरच्या नावाची नोंद केली जाते. मात्र, तिची शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्मदाखला, बँक खाते, आधार, पॅनकार्ड तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे माहेरच्या नावाने असतात. परिणामी विवाहानंतर नाव बदलण्यासाठी महिलांना गॅझेटच्या प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेत वेळ, पैसा आणि प्रशासकीय धावपळ यांचा अनाठायी बोजा महिलांवर पडत आहे.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत राऊळ यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विवाह दाखल्यावर दोन्ही नावांचा समावेश करण्याबाबत जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) जयप्रकाश परब यांच्याशी चर्चा करताना राऊळ यांनी सांगितले की, राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये विवाह प्रमाणपत्रावर लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करण्याची पद्धत अस्तित्वात आहे; मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातच ही सुविधा महिलांना का मिळू नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विवाहानंतर महिलेचे नाव बदलणे हा तिच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग असला, तरी तिच्या पूर्वीच्या ओळखीच्या सर्व नोंदी एका क्षणात पुसून टाकण्याची गरज नाही, असे राऊळ यांनी स्पष्ट केले. विवाह दाखल्यावर दोन्ही नावांचा उल्लेख झाल्यास पुढील काळात विविध शासकीय व प्रशासकीय कागदपत्रांमध्ये नावाची सांगड घालणे महिलांसाठी अधिक सुलभ होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने या मागणीची सकारात्मक दखल घेऊन माहेर आणि सासर या दोन्ही नावांचा समावेश असलेले विवाह प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील हजारो महिलांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला. त्यांच्या या मागणीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलेची ओळख विवाहानंतर बदलू शकते; पण तिचा भूतकाळ पुसला जाऊ नये—विवाह दाखल्यावर माहेर आणि सासर या दोन्ही नावांना समान स्थान मिळावे, हीच या मागणीमागची भूमिका आहे.



