– कायदा, शिक्षण, युवक आणि सामाजिक वास्तवाचा संशोधनपर वेध!, विद्यार्थी, संशोधक व कायदे अभ्यासकांसाठी ठरणार मोलाचा संदर्भग्रंथ.
सावंतवाडी : तरुणाई, गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्था या आजच्या काळातील अत्यंत संवेदनशील व परस्परांशी निगडित विषयांना अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक दृष्टिकोनातून भिडणारे ‘Youth, Crime and Justice : Maharashtra and Madhya Pradesh’ हे पुस्तक श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्या लेखणीतून साकारले आहे. या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले असून, कायदा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात या पुस्तकाची विशेष दखल घेतली जात आहे.
कृपा दृष्टी पब्लिकेशन्स, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाला ISBN 978-81-69896-50-4 हा आंतरराष्ट्रीय मानक पुस्तक क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ साहित्यिक अभिव्यक्ती न राहता युवक, गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्थेच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण संदर्भसाहित्य ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तरुणाईच्या वास्तवाचा अभ्यासपूर्ण आरसा –
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवकांसमोरील आव्हाने, गुन्हेगारीकडे वळण्यामागील विविध घटक आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर व सामाजिक प्रश्नांचा या पुस्तकात विविध अंगांनी अभ्यास करण्यात आला आहे. तरुणाई आणि गुन्हेगारीचे बदलते स्वरूप, न्यायव्यवस्थेची भूमिका तसेच सामाजिक परिस्थितीशी असलेले त्याचे नाते, या महत्त्वपूर्ण पैलूंकडे संशोधनपर दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या संदर्भातून विषयाचा वेध घेतल्यामुळे पुस्तकाला तुलनात्मक अभ्यासाचीही एक वेगळी परिमाणे लाभली आहेत. कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, कायदे अभ्यासक तसेच युवक व सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
कायदा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाला संशोधनाची जोड –
ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले याकायदेविषयक अभ्यासक, संशोधक तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला दिशा देताना विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे.
त्यांच्या लेखणीतून साकारलेले हे पुस्तक कायदा, युवक आणि समाज यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्याचा चिकित्सक मागोवा घेणारे असून, ज्ञान आणि सामाजिक जाणीव यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करते.
या संशोधनपर साहित्यकृतीच्या प्रकाशनाबद्दल शिक्षण, कायदा, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातून ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



