सातार्ड्यात रात्रीच्या अंधारात बिबट्याचा थरार!, युवतीवर अचानक झडप, पंजाच्या प्रहाराने केलं जखमी! ; दैव बलवत्तर म्हणून बचावला जीव! ; जि. प. सदस्य सुदन कवठणकर आक्रमक! ; वनविभागाला दिला सज्जड इशारा!, बिबट्याला तातडीने जेरबंद करून जखमी तरुणीला आर्थिक मदत करण्याची मागणी.

सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा-भटवाडी परिसरात बुधवारी रात्री बिबट्याने युवतीवर अचानक झडप घातल्याने एकच खळबळ उडाली. रात्रीच्या काळोखात घडलेल्या या थरारक घटनेत तन्वी प्रमोद कवठणकर (वय १९) हिच्या पायावर बिबट्याने पंजा मारला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या तावडीतून तन्वीचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तन्वी कवठणकर मोटरसायकलवरून प्रवास करीत होती. सातार्डा भटवाडी परिसरातून जात असताना अचानक बिबट्याने तिच्यावर झडप घेतली. काही क्षणांत घडलेल्या या अनपेक्षित हल्ल्याने तन्वीची मोठी तारांबळ उडाली. बिबट्याच्या पंजाचा पायाला जोरदार प्रहार झाल्याने ती जखमी झाली.

घटनेनंतर तिला तातडीने शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पायाला दुखापत झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत तन्वीच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत केली. तसेच त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून घटनेचा योग्य पंचनामा करावा, जखमी युवतीला नियमानुसार मदत मिळवून द्यावी आणि परिसरात वावरत असलेल्या बिबट्याचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली.

‘बिबट्याचा बंदोबस्त करा’; नागरिकांमध्ये संताप आणि भीती

सातार्डा-भटवाडी परिसरासह आजूबाजूच्या गावांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये-जा करणारे ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी आणि दुचाकीस्वार यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वनविभागाने केवळ पाहणी न करता तातडीने ठोस उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या घटनेनंतर सातार्डा परिसरातील नागरिकांच्या मनात एकच सवाल – ‘आता पुढचा नंबर कोणाचा?’ त्यामुळे वनविभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles