बुद्धिबळाच्या पटावर सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची दमदार चाल!, राष्ट्रीय ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत २२ वा क्रमांक पटकावत घेतली यशस्वी झेप!; ग्रँडमास्टरविरुद्ध खेळण्याचीही मिळाली संधी!

सावंतवाडी : बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक चाल ही संयम, बुद्धिचातुर्य आणि अचूक रणनीतीची कसोटी पाहणारी असते. अशाच कसोटीच्या पटावर आपल्या खेळातील कौशल्याची चमक दाखवत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकर याने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पणजी (गोवा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ब्लिट्झ रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्णने तब्बल २२ वा क्रमांक पटकावत सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

तिसवाडी बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने पणजी येथे एक लाख रुपयांच्या आकर्षक पारितोषिकांसह या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील जवळपास २०० नामांकित बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे, एका ग्रँडमास्टरसह चार इंटरनॅशनल मास्टर्सच्या उपस्थितीने स्पर्धेचा दर्जा आणि रंगत अधिकच वाढली होती.

या दिग्गज खेळाडूंच्या मांदियाळीत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकर याने आपल्या बुद्धिकौशल्याचा ठसा उमटवला. स्पर्धेतील अकरा फेऱ्यांमध्ये त्याने सहा विजय मिळवले, तर तीन फेऱ्या बरोबरीत सोडवत एकूण साडेसात गुणांची कमाई केली. या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने २२ वा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, ग्रँडमास्टर रॉय सप्तर्षी चौधरी यांच्याविरुद्ध टॉप टेबलवर खेळण्याची सुवर्णसंधीही बाळकृष्णला मिळाली. या कामगिरीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंग गुणांमध्येही वाढ झाली असून, रोख पारितोषिक देऊन त्याचा गौरव करण्यात आला.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, चिदानंद रेडकर, पुष्कर केळूसकर आणि अथर्व वेंगुर्लेकर यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या खेळाची चुणूक दाखवली.

यामध्ये पुष्कर केळूसकर याने तब्बल सहा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवत सहा गुणांची कमाई केली आणि ब्लिट्झ रेटिंगही प्राप्त केले. अथर्व वेंगुर्लेकर याने सहा गुण, हर्ष राऊळ याने साडेपाच गुण, तर चिदानंद रेडकर याने पाच गुणांची कमाई करत स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि सचिव स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय स्तरावरील या यशाने सावंतवाडीच्या बुद्धिबळविश्वात आनंदाची नवी चाल खेळली गेली आहे. बाळकृष्णसह मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली गुणवत्ता ही भविष्यातील मोठ्या यशाची नांदी ठरावी, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles