कराटेच्या मैदानात मिलाग्रीसच्या कन्यांचा दमदार ठसा!, विभागीय स्पर्धेत साची टोपले, प्राची गावकर यांची कांस्य भरारी! ; रत्नागिरीतील विभागस्तरीय कराटे स्पर्धेत दोघींनी पटकावला तृतीय क्रमांक, मिलाग्रीस स्कूलच्या क्रीडा यशात मानाचा आणखी एक शिरपेच!

सावंतवाडी : जिद्दीला जिद्दीची साथ, मेहनतीला आत्मविश्वासाची जोड आणि कौशल्याला संघर्षाची धार लाभली की यशाची शिखरे गाठता येतात, याचा प्रत्यय सावंतवाडीच्या मिलाग्रीस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडाप्रावीण्यातून घडवून आणला आहे. रत्नागिरी येथे पार पडलेल्या विभागस्तरीय कराटे स्पर्धेत शाळेच्या कु. साची टोपले आणि कु. प्राची गावकर या दोघींनीही आपापल्या वयोगटात तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या क्रीडा वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

या स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात कु. साची टोपले हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे आणि कराटे कौशल्याचे प्रभावी दर्शन घडवत तृतीय क्रमांकावर नाव कोरले. तर १४ वर्षांखालील वयोगटात कु. प्राची गावकर हिनेही प्रतिस्पर्ध्यांसमोर दमदार आव्हान उभे करत तृतीय क्रमांकाची कामगिरी साध्य केली. दोन्ही विद्यार्थिनींनी दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि खेळातील आत्मविश्वास उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

कराटे हा केवळ शारीरिक ताकदीचा खेळ नसून त्यामध्ये शिस्त, एकाग्रता, संयम आणि आत्मसंरक्षणाचे कौशल्य महत्त्वाचे असते. या गुणांचे दर्शन घडवत दोन्ही विद्यार्थिनींनी मिळवलेले यश निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल मिलाग्रीस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य फादर रिचर्ड सालढाणा तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी साची टोपले व प्राची गावकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातही त्यांनी यशाची अशीच उज्ज्वल परंपरा कायम राखावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मैदानावरच्या संघर्षातून आत्मविश्वासाची मशाल पेटवणाऱ्या या दोन कन्यांनी आपल्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय अशक्य नसते! त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles