सिंधुदुर्गनगरी (ओरोस) : ग्राहकांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि न्यायासाठी सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा एकदा ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे.
अॅड. पार्सेकर यांनी यापूर्वीच्या सलग तीन कार्यकाळांत ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या विविध शासकीय आणि निमशासकीय विभागांतील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
वीज वितरण कंपनी, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, पुरवठा विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित ग्राहकांच्या विविध समस्यांवर त्यांनी प्रभावीपणे आवाज उठविला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत सर्वसामान्य ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
केवळ तक्रारी मांडण्यापुरते मर्यादित न राहता ग्राहकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे, ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी जनजागृती करणे आणि अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणे, या माध्यमातून त्यांनी ग्राहक चळवळीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
विविध शासकीय विभागांच्या खातेप्रमुखांशी सुसंवाद आणि समन्वय राखत ग्राहकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष ठरली आहे. त्यांच्या याच सातत्यपूर्ण कार्याची पावती म्हणजे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर झालेली ही सलग चौथी निवड मानली जात आहे.
अॅड. नकुल पार्सेकर यांच्या या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कार्यकाळातही त्यांच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



