सावंतवाडी : शैक्षणिक क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेची, जिद्दीची आणि मेहनतीची चमक दाखवणाऱ्या सावंतवाडीच्या दत्तराज पै यांनी आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट (CA) फाऊंडेशन परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तम गुणांसह यश मिळवत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
दत्तराज यांच्या या यशामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे, २०२६ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेतही त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली होती. बारावीतील देदीप्यमान यशानंतर सीए फाऊंडेशन परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले यश ही त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाची, कठोर परिश्रमांची आणि ध्येयाप्रती असलेल्या समर्पणाची पावतीच म्हणावी लागेल.
दत्तराज यांच्या या दुहेरी यशाबद्दल यशश्री क्लासेसचे संचालक प्रा. एल. पी. पाटील यांनी दत्तराज पै तसेच त्यांच्या पालकांचे विशेष अभिनंदन केले. भविष्यात चार्टर्ड अकाऊंटंट क्षेत्रातही त्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी आणि आपल्या कर्तृत्वाने कुटुंबासह सावंतवाडीचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, दत्तराज पै यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवर्ग आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिद्दीला परिश्रमांची जोड आणि ध्येयाला अभ्यासाची साथ मिळाली की यशाची शिखरे गाठता येतात, याचे प्रेरणादायी उदाहरण दत्तराज पै यांनी आपल्या कर्तृत्वातून अधोरेखित केले आहे!



