वेंगुर्ला : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्यामध्ये वक्तृत्वकौशल्य, वैचारिक प्रगल्भता आणि संस्कारमूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळस यांच्या वतीने गुरुवार, २५ डिसेंबर २०२६ रोजी खुल्या वक्तृत्व, स्तोत्र पाठांतर व मनाचे श्लोक पठण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने सलग १३ व्या वर्षी आयोजित या स्पर्धा तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्था, मुंबई यांच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृहात (श्री शिवाजी हायस्कूल तुळस) सकाळी ९.३० वाजता सुरू होतील.
वक्तृत्व स्पर्धेत पाणीटंचाई आणि संत गाडगेबाबांवर विषय –

खुली वक्तृत्व स्पर्धा दोन गटांत होणार आहे. इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पाऊस भरपूर, तरी पाणीटंचाई का?’ हा विषय, तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त ‘स्वच्छतेपलीकडचे संत गाडगेबाबा’ हा विषय ठेवण्यात आला आहे. पहिल्या गटासाठी ५ ते ६ मिनिटे, तर दुसऱ्या गटासाठी ६ ते ७ मिनिटांची वेळमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे प्रथम क्रमांकासाठी ९९९ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७७७ रुपये व तृतीय क्रमांकासाठी ५५५ रुपये अशी पारितोषिके आहेत. तसेच प्रत्येकी ३३३ रूपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व क्रमांकांच्या विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
स्तोत्र पाठांतर स्पर्धेत दोन गट –

विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक व आध्यात्मिक साहित्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने स्तोत्र पाठांतर स्पर्धा दोन गटांत आयोजित केली आहे. इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत श्री गणपती स्तोत्र, तर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी श्री मारुती स्तोत्र ठेवण्यात आले आहे. दोन्ही गटांत प्रथम ७७७ रुपये, द्वितीय ६६६ रुपये, तृतीय ५५५ रुपये, उत्तेजनार्थ प्रथम ४४४ रुपये आणि उत्तेजनार्थ द्वितीय ३३३ रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
मनाचे श्लोक पठण स्पर्धा –

समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोकांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक पठण स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धकांनी मनाचे श्लोकांपैकी पहिले २५ श्लोक पाठ करून सादर करायचे आहेत. ही स्पर्धा वैयक्तिक स्वरूपाची असून स्पर्धकांना कोणत्याही पुस्तकाचा अथवा कागदाचा आधार घेता येणार नाही. श्लोकांचे स्पष्ट व शुद्ध उच्चार, लय, ताल, सादरीकरण आणि आत्मविश्वास या निकषांवर गुणांकन केले जाणार आहे. श्लोक म्हणताना चूक झाल्यास गुण कमी केले जातील. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ९९९ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७७७ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५५५ रुपये, तर उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी ३३३ रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
सर्व स्पर्धकांनी शाळेचे ओळखपत्र किंवा शाळेकडून मिळालेले शिफारसपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी वक्तृत्व स्पर्धेसाठी वैष्णवी परूळकर (७९७२१९३०३८) आणि इतर स्पर्धासाठी सानिया वराडकर (८६९८६९२६२३) यांच्याशी संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी केले आहे.



