चिमुकल्यांच्या विश्वात रमले पालकमंत्री नितेश राणे. ; विद्यार्थ्यांशी साधला स्नेहसंवाद, जाणून घेतली भविष्याची स्वप्ने!

सावंतवाडी : राजकारणाच्या धावपळीतही बालमनाशी नाते जोडणारा संवाद घडला की पदाचा बडेजाव बाजूला राहतो आणि माणुसकीचा सुगंध दरवळतो! याचाच प्रत्यय सावंतवाडीत आला. पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त सावंतवाडीत आलेले पालकमंत्री नितेश राणे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या बालविश्वात काही क्षण रममाण होण्याचा आनंद घेतला. पालकमंत्र्यांच्या या अनपेक्षित भेटीने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आटोपल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे माघारी परतत असताना कार्यक्रमस्थळाच्या बाजूला काही शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांची भेट घेण्यासाठी उत्सुकतेने उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुलांचा हा निरागस उत्साह पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता विद्यार्थ्यांना जवळ बोलावून त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस करत कोणत्या शाळेत शिकता? कोणत्या इयत्तेत आहात? कोणता क्लास करता? अभ्यास कसा सुरू आहे? भविष्यात मोठे होऊन काय बनण्याचे स्वप्न आहे? असे अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या या प्रश्नांमुळे सुरुवातीला काहीसे बुजलेले विद्यार्थी हळूहळू मोकळे झाले आणि पालकमंत्र्यांसोबत दिलखुलास गप्पा मारू लागले.

केवळ औपचारिक भेट न ठेवता विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, शिक्षण आणि भविष्यातील स्वप्नांविषयी जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पालकमंत्र्यांनी दिलेला हा आपुलकीचा वेळ विद्यार्थ्यांसाठी निश्चितच आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने चिमुकल्यांच्या आनंदाला जणू उधाण आले होते.

राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीतून वेळ काढत बालमनाशी साधलेला हा स्नेहसंवाद उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. पदापेक्षा माणुसकी मोठी आणि औपचारिकतेपेक्षा आपुलकीचा संवाद अधिक मोलाचा असतो, याची जाणीव करून देणारा हा प्रसंग ठरला.

यावेळी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, प्रतीक बांदेकर, सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles