सावंतवाडी : अनोळखी प्रदेश, अनोळखी माणसे आणि मनात असंख्य प्रश्न… अशा परिस्थितीत भरकटलेल्या एका निराधार महिलेसाठी माणुसकीचा हात पुढे आला आणि तिच्या जीवनात आशेचा किरण उजळला. गुजरात येथून चुकून रेल्वेत बसून सावंतवाडी परिसरात आलेल्या ४० वर्षीय महिलेला ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या रूपा गौंडर-मुद्राळे यांनी मायेचा आधार देत संविता आश्रमात सुरक्षित निवारा मिळवून दिला. त्यांच्या या संवेदनशील कार्यातून माणुसकीचा सुगंध पुन्हा एकदा दरवळला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पारपोली परिसरात एक परप्रांतीय महिला फिरताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली होती. अनोळखी परिसरात एकटीच फिरणाऱ्या या महिलेची अवस्था पाहून स्थानिक ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा गौंडर-मुद्राळे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी संबंधित महिलेचे नाव हिरनबेन देवजीभाई गोयल रापडिया असल्याचे समोर आले. आपण चुकून दुसऱ्या रेल्वेत बसल्यामुळे गुजरातमधून या भागात आल्याचे तिने सांगितले. अनोळखी ठिकाणी भरकटलेल्या या महिलेला मदतीची गरज असल्याचे लक्षात घेऊन रूपा गौंडर-मुद्राळे यांनी तिला सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेले.
पोलिसांनी दिलेल्या रीतसर पत्राद्वारे या महिलेला संविता आश्रमात दाखल करण्यात आले. त्यामुळे सध्या तिला सुरक्षित निवारा आणि आधार मिळाला आहे.
दरम्यान, या महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी रूपा गौंडर-मुद्राळे, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची टीम आणि प्रतिष्ठानचे सल्लागार शैलेश पै यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तिला पुन्हा आपल्या माणसांच्या कुशीत पोहोचवण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
रक्ताच्या नात्यांपलीकडेही माणुसकीचे नाते असते, हेच या घटनेने अधोरेखित केले आहे. भरकटलेल्या एका महिलेला केवळ आश्रयच नव्हे, तर आपुलकीचा दिलासा देणाऱ्या रूपा गौंडर-मुद्राळे आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



