सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवेत तांत्रिक बिघाड, प्रवाशांचा खोळंबा! ; प्रवाशांना लक्झरी बसने मोपा विमानतळावर हलविले, फ्लाय ९१च्या कारभाराबाबत नाराजी.

म्हापण : नव्याने सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळावरून नवी मुंबई येथे जाणाऱ्या फ्लाय ९१ विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हा बिघाड वेळेत दुरुस्त करणे शक्य न झाल्याने अखेर सर्व प्रवाशांना लक्झरी बसमधून गोव्यातील मोपा विमानतळावर नेण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून, संबंधित विमानसेवेच्या नियोजनाबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गहून मुंबईला जाण्यासाठी प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. विमानात बसल्यानंतर विमानातील वातानुकूलन यंत्रणा सुरू नसल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगण्यात आले. काही वेळानंतर पुन्हा प्रवाशांना विमानात बसविण्यात आले; मात्र तांत्रिक बिघाडाचे कारण देत दुसऱ्यांदा त्यांना विमानातून खाली उतरविण्यात आले.
दरम्यान, विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी गोव्याहून अभियंत्यांना पाचारण करण्यात आले. मात्र, बिघाडाचे नेमके स्वरूप काय आहे आणि विमानाचे उड्डाण किती वेळाने होणार, याबाबत संबंधित यंत्रणेकडून प्रवाशांना स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
यासंदर्भात फ्लाय ९१ कंपनीशी संपर्क साधला असता, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना गोव्यातील मोपा विमानतळावर हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रवाशांना दुसऱ्या विमानाने मुंबईला पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.
नव्याने सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवेबाबत प्रवाशांच्या अपेक्षा वाढलेल्या असताना, ऐन प्रवासावेळी उद्भवलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. विमानसेवेतील अशा प्रकारांमुळे प्रवाशांच्या वेळेचे आणि नियोजनाचे नुकसान होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विमान कंपनीने योग्य खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles