सावंतवाडी : आरोसबाग येथे दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेत सार्थक काळसेकर याने प्रथम क्रमांक पटकावला, तर सोहम नाईक याने द्वितीय आणि स्वरा म्हसकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत आपल्या कल्पकतेचा, कलात्मकतेचा आणि इतिहासप्रेमाचा सुंदर आविष्कार घडविला.





सावंतवाड : दीपावलीच्या मंगल पर्वावर किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याच्या परंपरेला उजाळा देत आरोसबाग येथील क्षेत्रीय युवक कला-क्रीडा मंडळाच्या वतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बालचमूंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेत सार्थक काळसेकर याने आपल्या उत्कृष्ट कलाकृतीच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळविला. सोहम नाईक याने द्वितीय, तर स्वरा म्हसकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वंश नाईक आणि लोकेश म्हसकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
क्षेत्रीय युवक कला-क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी दीपावलीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांविषयी आणि त्यांच्या पराक्रमाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचे परीक्षण सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान व अभिनव दर्पण प्रतिष्ठान, बांदा यांचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर आणि लेखापरीक्षक चंद्रकांत सावंत यांनी केले.
स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सिद्धेश नाईक, मिलिंद मिशाळ, संगम परब, सुज्ञानंद सावंत, ऋहान काळसेकर, अनिकेत नाईक, उदय म्हसकर, मानव मिशाळ, अनिकेत म्हसकर, अविनाश म्हसकर, आनंद परब, सचिन परब, पियुष घुरे, साईशा तारी आणि रामा काळसेकर यांनी परिश्रम घेतले.
किल्ले स्पर्धेच्या माध्यमातून बालमनात इतिहासाची आवड, सर्जनशीलता आणि स्वराज्याच्या वैभवाबद्दल अभिमान जागविण्याचे कार्य मंडळाने केले. दीपावलीच्या उत्सवी वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.



