मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा मैदानावर जल्लोष!, ‘खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग’ उत्साहात संपन्न! ; क्रीडांगणावर उमलली मुलींच्या जिद्दीची आणि आत्मविश्वासाची नवी कहाणी. ; ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळाली प्रतिभा सादर करण्याची संधी!

सावंतवाडी : फुटबॉलच्या मैदानावर घुमणारा चेंडू, विजयासाठी धडपडणाऱ्या खेळाडूंची जिद्द आणि संघभावनेतून साकारलेला उत्साह… अशा चैतन्यमय वातावरणात १७ वर्षांखालील मुलींसाठी आयोजित करण्यात आलेली ‘खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग’ उत्साहात संपन्न झाली. मुलींच्या क्रीडागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेने फुटबॉलच्या मैदानावर महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश दिला.

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या (MYAS) मार्गदर्शनाखाली, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिंधुदुर्ग जिल्हा फुटबॉल असोसिएशन (SDFA) आणि पाटणकर एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना योग्य दिशा मिळावी, आत्मविश्वास आणि संघभावनेची रुजवण व्हावी, तसेच क्रीडा क्षेत्रात मुलींचा सहभाग अधिक व्यापक व्हावा, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश होता. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींनाही आपल्या कौशल्याची चमक दाखवण्याची संधी मिळावी, त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे आणि क्रीडा क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना प्रेरणा मिळावी, या दृष्टिकोनातून हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

या स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलच्या मैदानावर मुलींच्या जिद्दीचे, चिकाटीचे आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडले. खेळातून शिस्त, परस्पर सहकार्य आणि नेतृत्वगुण विकसित होतात, याची प्रचिती या उपक्रमातून आली. मुलींच्या क्रीडा सहभागाला प्रोत्साहन देणारी ही लीग केवळ फुटबॉल स्पर्धा न राहता त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा प्रेरणादायी सोहळा ठरली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरसेविका तथा महिला व बालविकास कल्याण सभापती सौ. दीपाली भालेकर, मेरा युवा भारत (युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय) सिंधुदुर्ग जिल्हा युवा पुरस्कारार्थी जयराम जाधव, महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार विजेते वक्ते तथा मुख्यमंत्री महामित्र पुरस्कार विजेते पत्रकार प्रा. रूपेश पाटील उपस्थित होते.

यावेळी फुटबॉल प्रशिक्षक श्री. वसंत कदम, पेंडूरकर सर, खान सर आणि शेख सर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली.

मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक करत त्यांना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले. मुलींनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा, आपल्या कौशल्याच्या बळावर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यशाची शिखरे गाठावीत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिजा मकानदार यांनी केले.

‘खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग’च्या माध्यमातून मुलींच्या क्रीडास्वप्नांना नवी उभारी मिळाली असून, मैदानावर उमटलेल्या त्यांच्या जिद्दीच्या पाऊलखुणा भविष्यातील यशस्वी खेळाडूंच्या वाटचालीची नांदी ठरतील, असा विश्वास या उपक्रमातून व्यक्त झाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles