सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन हायस्कूलच्या पटांगणावर दिमाखदार पद्धतीने संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीम. कविता शिंपी तसेच पोलीस स्टेशन सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण तसेच ख्रिस्ती धर्म प्रांताचे सर्व फादर्स, सिस्टर्स प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर प्रार्थना नृत्यातून विद्यार्थ्यांनी परमेश्वराची आराधना केली. उपस्थित मान्यवरांचा ते करत असलेल्या सेवेसाठी प्रशालेच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी प्रशालेला आर्थिक सहकार्य करणारे ॲड. नंदकिशोर कासकर यांच्या वहिनी सौ. स्नेहा कासकर यांचाही सन्मानचिन्ह, शाल व रोप देऊन करण्यात आला. प्राथमिक स्वरूपात शाळेचे पालक व ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे तसेच पोलीस हवालदार निलेश पांगम व उपस्थित अन्य मान्यवरांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावर कॅरम या स्पर्धेत यश संपादन केलेल्या कु.अमूल्य गाडी व कु. राम फाले तसेच नेमबाजी या क्रिडा प्रकारासाठी कु. अवनी भांगले व चित्रकलेतील प्रविण्यासाठी कु. प्रिया देसाई यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मनोगतामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम.कविता शिंपी यांनी शाळेच्या कामकाजाचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्या म्हणाल्या आपण शैक्षणिक काळात आई वडीलानंतर गुरुंना फारचं महत्त्व आहे. मिलाग्रिस हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहेत. दैनंदिन दिवसांपासून शैक्षणिक ज्ञान देत आहेत. आपण मुंग्यासारखं एका पाठोपाठ एक चालत राहिले पाहिजे. ज्ञान घेताना जिज्ञासा जागृत ठेवून आयुष्य घडवा. मोबाईल दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला असला तरी ते हत्यार बनणार नाही, अशी खबरदारी घ्या. पालकांनी मुलांना वेळ द्या. शिक्षकांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. आई – वडील आणि गुरूजींनानी मोलाचं योगदान देत आहे. अभ्यास आणि पाठांतर करून चालणार नाही तर ते आत्मसात केले पाहिजे.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांनी शाळा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आपल्याकडून पूर्णतः सहकार्य असल्याचे सांगत शालेय प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, मिलाग्रिस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध पातळ्यांवर यश संपादन केले. शैक्षणिक प्रगतीपुस्तक चांगले आहे. मोबाईल अति वापर टाळावा. अभ्यासासाठी वापर करून मोबाईल जाळात फसणार नाही, अशी खबरदारी घ्यावी.
या कार्यक्रमादरम्यान प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या कारकिर्दीत सलग दोन वर्ष ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ या शासन स्तरावरील राबविण्यात आलेल्या अभियानामध्ये प्रशालेचा सहभाग व सलग दुसऱ्यांदा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक तसेच जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फादर रिचर्ड सालदान्हा म्हणाले, मिलाग्रिस शाळा ९० वर्ष सावंतवाडी शहरात कार्यरत आहे. एक हजार ९२ विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व विकासाठी आम्ही मेहनत घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दरम्यान झालेल्या विविध कार्यक्रमांसाठी प्रशालेचे शिक्षक दत्ताराम नाईक व जयदेव मणेरकर लिखित व दिग्दर्शित व अन्य सहकारी यांच्या सहकार्यातून विविध नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करीत प्रेक्षकांना नृत्याकडे घेऊन जात आज समाजामध्ये निर्माण होणारा नात्यांमधील दुरावा तसेच आजच्या तरुण पिढीला त्यांच्या आयुष्यातील आई वडिलांचे महत्व व त्यांच्या प्रती कर्तव्य याची जाणीव करून देणारा संदेश या स्नेहसंमेलनाच्या संपूर्ण नियोजनातून करून दिला. यावर्षी संपन्न झालेल्या या वार्षिक संमेलनाच्या आयोजन व नियोजनासाठी सर्व माजी शिक्षक, शिक्षक पालक संघ व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच उपस्थित सर्व पालक व प्रेक्षक वर्गांमधून शाळेतील सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर यांनी व्यक्त केले.