मालेगाव हे रोहिंग्यांचे आश्रयस्थान झाले आहे. आपल्याकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत. मालेगावातून व्होट जिहाद सुरु आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ते म्हणाले, मालेगावात १५०० बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखला देण्यात आला आहे. ही खूप गंभीर बाब आहे. या प्रकरणात मी स्वतः लक्ष देत आहे. या प्रकरणात दोन प्रकारचे गोंधळ दिसत आहे. एकात सर्व सामान्य माणूस फसत आहे. दुसऱ्या बाजूला राजकारणी, माफिया, गुंड, भ्रष्टाचारी, ड्रग माफिया ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी मनी लॉड्रीग करीत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
अधिकाऱ्यांचे निलंबन करावे –
किरीट सोमय्या म्हणाले, मालेगावात जे भारतीय नाहीत त्या १५०० जणांना जन्माचा दाखल दिला गेला आहे. मालेगाव मनपातून हे जन्मप्रमाणपत्र दिले गेले आहे. या सर्व लोकांनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यांच्याकडून आधारकार्ड झाले असल्याची शक्यता आहे. या सर्व लोकांची चौकशी करावी. त्यांचे जन्मप्रमाणपत्र रद्द करावी, अशी मागणी आपण सरकारकडे करणार आहे. मालेगाव हे व्होट जिहादचे केंद्र बनले आहे. या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, त्यांचे निलंबन करण्यात यावे.
अधिकाऱ्यांकडून चूक मान्य –
जिल्हाधिकारी कार्यालयातून आणि आयुक्त कार्यालयातून हे दाखले देऊन टाकला आहे. त्यावर एकाच पत्ता आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्यासाठी जन्म दाखला देण्याचा हा प्रकार आहे. मालेगाव तहसीलदार, महानगरपालिका आयुक्त यांनी आपली चूक मान्य केली आहे. अनवधानाने हे जन्मप्रमापत्र देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहेत. ज्यांना प्रमाणपत्र दिले आहे त्यांची परत चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. मालेगावात झालेल्या नमको बँक १२५ कोटी अपहार प्रकरणात चौकशीसाठी किरीट सोमय्या सोमवारी मालेगावात दाखल झाले. यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. त्यांना या प्रकरणाची चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणार आहोत. मालेगावातील बांगलादेशी आणि रोहिंग्यांची पडताळणी करण्याचे काम एटीएसने करावे, अशी मागणी करणार आहोत.