ओटवणे येथील सामायिक घराच्या असेसमेंटमध्ये परस्पर फेरफार प्रकरणी विजय गांवकर व महेश गांवकर यांचे प्रजासत्ताक दिनी उपोषण.!

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे गावाचे सरपंच यांनी सामायिक घराच्या असेसमेंटमध्ये परस्पर फेरफार करीत सामायिक घर एकाच व्यक्तीच्या नावावर केले. त्यामुळे सदरचे नियमबाह्य असेसमेंट रद्द करून घराची फेर आकारणी करण्यासह ओटवणे सरपंच आत्माराम शिवराम गावकर यांनी आपल्या अधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर गुरूवारी २३ जानेवारीपर्यंत नियमोचित कारवाई न केल्यास सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण छेडण्याचा इशारा ओटवणे गावठणवाडी येथील विजय अनंत गावकर आणि महेश सुरेश गावकर यांनी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात विजय गावकर आणि महेश गावकर म्हणतात, ग्रामपंचायत घर क्रमांक २५९अ (वसंत शिवराम गावकर), २५९ ब (सुरेश शिवराम गावकर),२५९ क (विजय अनंत गावकर), घर क्र २६० (शिवराम शंभा गावकर) यांच्या नावे वडीलोपार्जित सामायिक घर होते. सदरचे घर जीर्ण झाल्यानंतर नवीन बांधण्यात आले. त्यानंतर पूर्वीप्रमाणे या घराची घरपट्टी आकारण्यासाठी अर्ज करण्यात आला. मात्र सरपंचांनी नियमाप्रमाणे या अर्जाचा मासिक बैठकीत विषय घेतला नाही. त्यानंतर शिवराम गावकर यांचे भाऊ प्रभाकर गावकर यांनी घर क्रमांक २६० ची फेर आकारणीची मागणी केल्यानंतर ग्रामसेवकांनी हा विषय ग्रामसभेच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचे सांगूनही सरपंचांनी बेकायदेशीरपणे हा विषय ग्रामसभेत घेत मंजूर करताना संपूर्ण घराची कर आकारणी शिवराम गावकर यांच्या नावे केली.
याबाबत गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी सदर ग्रामसभेतील ठरावाद्वारे केलेली कार्यवाही बेकायदेशीर असल्याचे ग्रामपंचायतीला दोन वेळा सांगुन नियमानुकुल कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मात्र ग्रामपंचायतीने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे घर क्र २६० चा असेसमेंट रद्द करून या घराची फेरआकारणी करावी तसेच सरपंचांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याबद्दल त्यांच्यावर नियमोचित कारवाई करावी अशी विजय गावकर आणि महेश गावकर यांची मागणी आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles