सावंतवाडी : सातुळी-मधलीवाडी येथे शांताराम कृष्णा कानसे या वृद्धाने आज दुपारच्या सुमारास झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदनासाठी तो मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला असता तब्बल दोन तास सफाईगार (कटर) नसल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही. प्रशासनामुळे मृतदेहाची हेळसांड होऊन नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व सातुळी उपसरपंच स्वप्नील परब यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
आज दुपारी ही घटना घडली. सातुळी-मधलीवाडी येथील या वृद्धाने आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला असता तब्बल दोन ते अडीच तास मृतदेह तात्कळत ठेवण्याची वेळ नातेवाईक व ग्रामस्थांवर आली. याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश चौगुले यांना विचारलं असता सफाईगार निवृत्त होणार असल्याने त्या कामासाठी गेले असल्याने शवविच्छेदनास विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराबद्दल सातुळी उपसरपंच स्वप्नील परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जीवंतपणी सोसव्या लागणाऱ्या यातना मेल्यावरही संपत नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, मागील महिन्यात बँक कर्मचारी शवविच्छेदनावेळी अशीच परिस्थिती अनुभवाला आली. यात सुधारणा होण आवश्यक होतं. पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे यासंबंधी निवेदनाद्वारे लक्ष वेधलं होत. किमान ३ सफाईगार आवश्यक असताना केवळ एकाच्या जीवावर कारभार सुरू आहे. ते देखील आता निवृत्त होणार आहेत. प्रशासनाच लक्ष वेधूनही परिस्थिती बदलत नाही. येथील असुविधा, डॉक्टरांची कमतरता, रिक्त पदे याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुविधा पुरविण्याच आश्वासन दिल्यानंतरही आजही गोवा बांबोळी येथे रूग्ण पाठवले जात आहेत. गोवा येथे जिल्ह्याची १०८ जळून खाक झाल्याचेही उदाहरण समोर आहे. येथील गैरसोय व तज्ञ डॉक्टरांची कमतरता कायम आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत ही परिस्थिती सुधारावी, गोरगरीब रूग्ण, नातेवाईकांचे होणारे हाल रोखावेत. अन्यथा, रूग्णालयासमोर जनसामान्यांसह उग्र आंदोलन छेडलं जाईल, याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार अन् वैद्यकीय प्रशासन राहील, असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.