सावंतवाडी : आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या राजकीय समीकरणे अक्षरशः उलथापालथ होताना दिसत असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी जिल्हा परिषद सदस्य शर्वाणी गावकर यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून संपूर्ण लढतीचं चित्र बदलून टाकलं आहे. भाजपमधून उमेदवारी नाकारली असली, तरी गेल्या पाच वर्षांत केलेल्या ठोस विकासकामांच्या जोरावर गावकर यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून, घरोघरी प्रचाराला मतदारांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महायुतीने ऐनवेळी शर्वाणी गावकर यांच्याऐवजी सुदन कवठणकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने आरोंद्यात राजकीय खळबळ उडाली होती. निष्ठावान कार्यकर्ती असूनही डावलल्याने गावकर यांनी कोणतीही तडजोड न करता बंडखोरीचा स्पष्ट पवित्रा घेत अपक्ष निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय आता महायुतीसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांचा भक्कम जनसंपर्क, विकासकामांची ठोस कामगिरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशील भूमिका यामुळे त्यांच्या प्रचाराला जबरदस्त धार आली आहे. प्रचारादरम्यान बोलताना शर्वाणी गावकर यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “जिल्हा परिषद सदस्य असताना आरोंदा मतदारसंघात अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लावले. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमीच जनतेसोबत उभी राहिले. माझ्या कामाची खरी पावती जनता देणार आहे.”
“ही लढत केवळ राजकारणासाठी नसून नियोजनबद्ध आणि पारदर्शक विकासासाठीची आहे. जनतेचा वाढता पाठिंबा पाहता माझा विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.शर्वाणी गावकर यांच्या प्रचारात जिल्हा परिषद उमेदवार उत्साह परब, माजी सरपंच बबन सातोसकर, आबा धुरी, सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, रुपेश साळगावकर, प्रसाद मांजरेकर, नाना नाईक, उत्तम शिरोडकर, गुरुनाथ गवंडी, जयराम मसुरकर, लक्ष्मण खोत, सुजित सर देसाई, वेदांत साळगावकर, स्नेह पेडणेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी होत असून, गावागावात ‘शर्वाणी गावकरच हवा’ अशीच चर्चा रंगताना दिसत आहे.
एकंदर आरोंदा मतदारसंघात अपक्ष शर्वाणी गावकर यांनी घेतलेली आघाडी पाहता, ही निवडणूक आता एकतर्फी न राहता प्रतिष्ठेची आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.



