मालवण : कोकणभूमी ही अवलिया संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक महान संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र धरती आज पुन्हा एकदा दुःखाच्या सावटाखाली आली आहे. प. पू. भालचंद्र महाराज, प. पू. राऊळ महाराज, प. पू. साटम महाराज, प. पू. नामदेव महाराज आणि प. पू. राणे महाराज यांसारख्या अवलिया संतांच्या पवित्र सहवासाने कोकणभूमीला आध्यात्मिक तेज प्राप्त झाले. विशेषतः प. पू. राणे महाराज यांचा सहवास आणि कृपादृष्टी हल्लीच्या पिढीने अनुभवली होती. त्यांच्या देहत्यागानंतर अनेक भक्त स्वतःला पोरके समजू लागले होते.
मात्र, त्याच काळात या भूमीत प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराज यांचा दिव्य वावर सुरू झाला. गेली सुमारे चार दशके त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने, साधेपणाने आणि अध्यात्मिक मार्गदर्शनाने असंख्य भक्तांच्या जीवनाला दिशा दिली. त्यांच्या हास्यमय चेहऱ्यामागे दडलेली करुणा आणि अध्यात्मिक तेज अनेकांना जीवनातील संकटांत आधार देणारे ठरले.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव परिसरात त्यांच्या भक्तांचा मोठा परिवार निर्माण झाला होता. अनेकांच्या आयुष्यात त्यांनी श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित केला.
मात्र आज, सायंकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराज यांनी देह ठेवला आणि त्यांच्या देहत्यागाच्या वार्तेने संपूर्ण भक्त-परिवारावर शोककळा पसरली. त्यांच्या जाण्याने असंख्य भक्त पोरके झाल्याची भावना व्यक्त करत आहेत.
प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराज यांचा अंत्यसंस्कार विधी उद्या, शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजताश्री राम मंदिर, प. पू. राणे महाराज मठ (कुसरवेवाडी), कट्टा, मालवण येथे होणार आहे.
त्यांच्या पवित्र स्मृती आणि आध्यात्मिक कार्याची परंपरा भक्तांच्या हृदयात सदैव जिवंत राहील. कोकणभूमीवर त्यांचा पदस्पर्श जरी आता थांबला असला, तरी त्यांनी दिलेला भक्तीचा मार्ग आणि सद्गुरुकृपेची अनुभूती पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.



