हिंदवी स्वराज्याच्या गौरवदिनाचे ओटवणेत उत्साहात स्मरण! राज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक; सभामंडप उभारणीसाठी सहकार्याचे विशाल परब यांचे आश्वासन.

सावंतवाडी : “जय भवानी… जय शिवाजी!” या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे (देऊळवाडी) येथे अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि शिवप्रेमाने भरलेल्या वातावरणात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून स्वराज्याच्या महान इतिहासाला वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर तसेच भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शिवरायांच्या कार्याचा आणि स्वराज्य संकल्पनेचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड. अनिल निरवडेकर आणि विशालजी परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेला संघर्ष, न्यायनिष्ठ प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्राभिमान जागविणारे त्यांचे विचार यावर सखोल भाष्य केले. आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार, ध्येय आणि आदर्श आत्मसात करून समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विशालजी परब यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण आश्वासन देताना सांगितले की, “ज्याप्रमाणे ओटवणे येथील श्री देव रवळनाथ मंदिरासमोर सभामंडप उभारण्यासाठी सहकार्य करण्यात आले, त्याचप्रमाणे या ठिकाणीही सभामंडप उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करू.” त्यांच्या या घोषणेचे उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.


या प्रसंगी भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, माजी पोलिस पाटील तुकाराम गावकर, ओटवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक होडावडेकर सर, चेतन गावकर तसेच या उपक्रमासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देणारे वैभव भानसे, धिरेंद्र म्हापसेकर, रामा गावकर, चंद्रकांत गावकर, विजय कविटकर, नारायण भानसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे परिसरातील शिवप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश पुन्हा एकदा समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या उपक्रमातून साध्य झाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles