सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जिल्हा परिषद सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मायकल डिसोजा यांनी नगराध्यक्षांवर आरोपांची सरबत्ती केली आहे. मुलांच्या रोजगार निर्मितीसाठी नगरपालिका प्रशासनाकडे जागा भाड्याने मागितली असता लाखो रुपयांच्या भाड्याची मागणी करण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
श्री. डिसोजा म्हणाले, “तडजोडीच्या भूमिकेतून आम्ही तब्बल ६० हजार रुपये दिले. मात्र सावंतवाडीत जर अमेरिकेचे दर लावले जात असतील, तर सर्वसामान्यांनी जगायचे कसे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी नगराध्यक्षांवर हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवित असल्याचा आरोप करत, “ही हुकूमशाही तात्काळ बंद करावी, अन्यथा अनेक धक्कादायक प्रकरणे जनतेसमोर आणू,” असा थेट इशारा दिला.
‘चिरीमिरी मिळणार नाही; ठेकेदारांकडून घेतलेल्या पैशांची माहिती बाहेर काढणार’
आरोपांची धार आणखी तीव्र करत डिसोजा म्हणाले की, “ठेकेदारांकडून चिरीमिरी घेण्याची सवय लागली असेल, पण आमच्याकडून ती अपेक्षा ठेवू नये. कोणाकडून किती पैसे घेतले, याची माहिती आमच्याकडे असून योग्य वेळी सर्व पुरावे जनतेसमोर मांडणार आहोत.”
या संपूर्ण प्रकरणाकडे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री यांचेही लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सावंतवाडी शहराची वाट लावली; कामांची स्पॉट पाहणी करून पोलखोल करणार’
नगरपालिकेच्या विकासकामांवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “सावंतवाडी शहराची पूर्णपणे वाट लागली आहे. अनेक विकासकामे बोगस पद्धतीने सुरू असून येत्या काही दिवसांत संबंधित ठिकाणी स्पॉट पंचनामा करून सत्य जनतेसमोर आणणार,” असा दावा त्यांनी केला.
‘मुलांच्या रोजगारावर टाळे मारण्याचा प्रयत्न’
डिसोजा यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी युवक रोजगारासाठी काम करत असताना नगराध्यक्षांनी तेथे पाहणी करून काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे सांगत जागेला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. “हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून ही जागा पाटेकर-उपरलकर देवस्थानची आहे. जास्त काळ अशी हुकूमशाही चालणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
‘निवडणुकीतील खर्चाची वसुली सुरू?’
आरोपांचा आणखी एक बॉम्ब टाकताना डिसोजा म्हणाले, “निवडणुकीत आमचे पैसे खर्च झाले, असे सांगून काही लोकांकडून त्याची वसुली केली जात आहे. याबाबत आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. नगराध्यक्षांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत घेतली; मात्र आज आमच्याशीच अशी वागणूक होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांशी कसे वागत असतील?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, डिसोजा यांच्या आरोपांमुळे सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या आरोपांवर नगराध्यक्षांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“२०० स्क्वेअर फूट जागेसाठी १५ दिवसांचे १.८० लाख भाडे; हा अमेरिकेचा रेट की सावंतवाडीचा?” — मायकल डिसोजांचा नगराध्यक्षांवर हल्लाबोल
सावंतवाडी नगरपरिषदेच्या मालकीच्या २०० स्क्वेअर फूट जागेसाठी अवघ्या १५ दिवसांसाठी तब्बल १ लाख ८० हजार रुपये भाडे मागण्यात आले. हा दर महिन्याला ३ लाख ६० हजार रुपयांपर्यंत जात असून हा “सावंतवाडीचा नव्हे तर अमेरिकेचा रेट” असल्याची टीका करत जिल्हा परिषद सदस्य तथा ग्रो बीग टेक्नॉलॉजीचे संचालक मायकल डिसोजा यांनी नगराध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. नगराध्यक्षांची कार्यपद्धती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी हुकूमशाही असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना डिसोजा म्हणाले की, ग्रो बीग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सिंधुदुर्गातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. सध्या १६० युवक-युवतींना रोजगार मिळाला असून भविष्यात आणखी २५० जणांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी नगरपरिषदेच्या रिक्त जागेची मागणी करण्यात आली होती.
त्यावेळी प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी नाममात्र भाड्याने जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र नंतर नगराध्यक्षांनी बोलावून घेत २०० स्क्वेअर फूट जागेसाठी १५ दिवसांचे १ लाख ८० हजार रुपये भाडे मागितल्याचा दावा त्यांनी केला. गरज असल्यामुळे अखेर १५ दिवसांसाठी सुमारे ५९ हजार रुपये भरल्याचेही त्यांनी सांगितले.
“रोजगार देणाऱ्यांना सहकार्याऐवजी अडथळे”
“सिंधुदुर्गातील युवक रोजगाराअभावी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेत असताना आम्ही रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करत आहोत. अशा वेळी सहकार्य करण्याऐवजी अडथळे निर्माण केले जात आहेत. नगराध्यक्षांनी केंद्राला भेट देऊन युवक शौचालयाचा वापर कसा करतात, असे प्रश्न उपस्थित केले. मुलांनी शौचालय वापरायचे नाही तर घरी जायचे का?” असा सवालही डिसोजा यांनी उपस्थित केला.
“टक्केवारीची अपेक्षा; पण एक रुपयाही देणार नाही”
नगराध्यक्षांचे लक्ष विकासापेक्षा “टक्केवारी”वर असल्याचा गंभीर आरोप करत डिसोजा म्हणाले, “आमच्या कंपनीकडूनही त्यांना काही अपेक्षा होती. काही लोकांना भेटण्याचे संकेत दिले गेले. मात्र आम्ही कोणालाही एक रुपया देणार नाही. शासनाचे जेवढे अधिकृत शुल्क असेल तेवढेच भरू.”
“२५ ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स आमच्याकडे”
पत्रकार परिषदेत सर्वाधिक खळबळजनक आरोप करताना डिसोजा यांनी सांगितले की, नगराध्यक्ष आणि काही ठेकेदारांमधील कथित व्यवहारांच्या २५ ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स त्यांच्या ताब्यात आहेत.
“कोण कुठे बसून काय करतो, कोणाशी काय व्यवहार होतात याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. वेळ आल्यास सर्व पुरावे जनतेसमोर आणू. उद्यापासून लोकप्रतिनिधी म्हणून भ्रष्टाचाराचा पंचनामा सुरू करू,” असा इशाराही त्यांनी दिला.
“मुंबई विद्यापीठ केंद्राला मोफत जागा; आम्हाला लाखोंचे भाडे”
ज्या इमारतीत मुंबई विद्यापीठाचे केंद्र गेली सहा वर्षे कार्यरत आहे, त्या केंद्राकडून एक रुपयाही भाडे घेतले जात नसल्याचा दावा करत डिसोजा म्हणाले, “रोजगार निर्मिती करणाऱ्या आमच्या संस्थेला मात्र लाखो रुपयांचे भाडे सांगितले जात आहे. हा अन्याय असून कायमस्वरूपी जागा मिळावी यासाठी नगरपरिषदेला पत्र दिले आहे.”
भाजप प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार
या संपूर्ण प्रकरणाची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांना देणार असल्याचे सांगून डिसोजा म्हणाले, “हा केवळ एका संस्थेचा प्रश्न नाही, तर सिंधुदुर्गातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. हुकूमशाही आणि मनमानी आम्ही सहन करणार नाही.”
पत्रकार परिषदेला ग्रो बीग टेक्नॉलॉजीचे संचालक सुशांत पास्ते उपस्थित होते.
डिसोजा यांचे गंभीर आरोप –
२०० स्क्वेअर फूट जागेसाठी १५ दिवसांचे १.८० लाख भाडे मागितल्याचा दावा
नगराध्यक्षांवर टक्केवारी आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
२५ ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स असल्याचा दावा
रोजगार केंद्राला लॉक मारण्याचा इशारा दिल्याचा आरोप
रवींद्र चव्हाण व नितेश राणे यांचे लक्ष वेधणार
“ही सावंतवाडीची नव्हे, अमेरिकेची भाडे पद्धत” असा टोला
“आमचे आरोप खोटे असतील तर देव पाटेकरासमोर येऊन उत्तर द्यावे; अन्यथा वेळ आल्यावर सर्व पुरावे जनतेसमोर मांडू,” असा थेट इशारा मायकल डिसोजा यांनी दिला.


