कणकवलीत साकारणार एक कोटींचे ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’. ; नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते भूमिपूजन उत्साहात., शहरात आणखी आधुनिक उद्याने उभारणार!

कणकवली : कणकवली शहरातील सुतारवाडी-निमेवाडी परिसरात साकारण्यात येणाऱ्या सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले की, कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून, आधुनिक सुविधांनी युक्त उद्याने उभारणे हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा, संवाद आणि आरोग्यवर्धक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागाही निर्माण होणार आहे.

प्रस्तावित उद्यानामध्ये लहान मुलांसाठी अत्याधुनिक खेळ साहित्य, नागरिकांसाठी मनोरंजनाच्या सुविधा तसेच परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे विविध घटक विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि आनंददायी वातावरण लाभणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, कणकवली शहरातील विविध भागांत आणखी अद्ययावत व आधुनिक उद्याने उभारण्याचा नगरपंचायतीचा मानस असल्याचे सांगत, आगामी काळात विकासकामांच्या माध्यमातून कणकवली शहराची नवी ओळख निर्माण करण्यात येईल, असा विश्वासही पारकर यांनी व्यक्त केला.

या भूमिपूजन कार्यक्रमास कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी आमदार राजन तेली, नगरसेवक संकेत नाईक, लुकेश कांबळे, दिवाकर मुरकर, महेश कोदे तसेच प्रशासन अधिकारी अमोल अगम यांच्यासह मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles