सावंतवाडीत राजकीय कलगीतुरा शिगेला, तिलारीच्या पाण्यावरून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा! ; केसरकर-मुळीक संघर्षात अवनी राऊळ यांची दमदार एन्ट्री! ; गौरव मुळीकांची भूमिका जनतेच्या हिताची; आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे!” : पं. स. सदस्या अवनी राऊळ.

सावंतवाडी: तिलारी धरणाचे हक्काचे पाणी फाईव्ह स्टार हॉटेलला देण्याच्या कथित प्रस्तावावरून आणि तालुक्याची रखडलेली आमसभा या मुद्द्यावरून सावंतवाडीतील राजकारण अक्षरशः तापले आहे. जनतेच्या पाण्याच्या हक्कावरून सुरू झालेला वाद आता थेट राजकीय रणांगणात पोहोचला असून आमदार दीपक केसरकर आणि पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

या वादाला आता नवे आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. माडखोल मतदारसंघाच्या धडाडीच्या पंचायत समिती सदस्य सौ. अवनी अमित राऊळ यांनी थेट मैदानात उतरून उपसभापती गौरव मुळीक यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. “गौरव मुळीक यांनी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

या राजकीय संघर्षाची ठिणगी आमदार दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेतून पडली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उपसभापती गौरव मुळीक यांच्या अनुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “ते या पदावर नवीन आहेत, त्यांना वस्तुस्थितीची पूर्ण माहिती नाही; मी स्वतः त्यांना माहिती देतो,” असा टोला लगावला होता.

मात्र, या टीकेला गौरव मुळीक यांनीही तितक्याच आक्रमक शैलीत प्रत्युत्तर देत, “प्रथम तालुक्याची रखडलेली आमसभा घ्या. त्या आमसभेतच जनतेसमोर आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ,” असे थेट आव्हान आमदारांना दिले.

दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच अवनी राऊळ यांनी मुळीक यांच्या बाजूने उभे राहत संघर्षाला आणखी धार दिली आहे. स्थानिक जनतेच्या पाण्याच्या हक्कासाठी घेतलेला मुळीक यांचा पवित्रा योग्य असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आता आमदार विरुद्ध उपसभापती असा रंगलेला हा संघर्ष केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तिलारीच्या पाण्याचा प्रश्न, जनतेचा हक्क आणि रखडलेली आमसभा या मुद्द्यांवरून आगामी काळात सावंतवाडीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे होणारी आमसभा ही केवळ प्रशासकीय बैठक न राहता राजकीय शक्तिप्रदर्शनाचे व्यासपीठ ठरणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles