पूर्व मेदिनीपूर : पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दियामध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली आहे. हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या पाइपलाइनमध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. रिफायनरीला लागलेल्या आगीत कमीत कमी ३५ कर्मचारी होरपळल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेक जणांची प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील ही घटना सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. रिफायनरीतील केमिकलच्या पाइपमधून अचानक आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. केमिकल ज्वलनशील असल्याने काही क्षणात आग सर्वत्र पसरली. या आगीत अनेक कर्मचारी होरपळले गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. काही अग्निशमन दलाला माहिती दिली.
३५ जण जखमी –
जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने हल्दियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही कर्मचाऱ्यांना तामलुक मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
हल्दिया आणि पांसकुंडाला जोडणाऱ्या रेल्वे ट्रॅकजवळ ही दुर्घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील रेल्वे सेवा थांबवण्यात आली आहे. सुरुवातीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आल्या होत्या. मात्र, आग वाढू लागल्याने आणखी गाड्या बोलवण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 12 गाड्या घटनास्थळी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पाइपलाइनमधून केमिकलची गळती होत असल्याने आगीची दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या प्रशासनाने निवेदनात म्हटलं की, पाइपलाइनच्या चोरी होणार्या पॉइंटजवळ ही आग लागली. ही पाइपलाइन ‘नॅप्था’ची असून लोकांना घटनास्थळापासून दूर उभे राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रशासन आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेचा तपासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या तपासानंतर रिफायनरीला आग लागण्याचे खरं कारण समोर येणार आहे.



