वेंगुर्ला : “संकटाच्या क्षणी जो धावून येतो, तोच खरा नेता!” या उक्तीची प्रचिती पुन्हा एकदा आरवली येथे आली. अलीकडेच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाचे माजी बूथ अध्यक्ष एकनाथ साळगांवकर यांच्या नव्याने बांधलेल्या घरावरील पत्रे उडून मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी कोणतीही विलंब न लावता थेट घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि साळगांवकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देत दिलासादायक आधार दिला.
घरावरील पत्रे उडाल्यामुळे कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले होते. या कठीण प्रसंगी विशाल परब यांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत, “संकट कितीही मोठे असले तरी भारतीय जनता पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभा आहे,” असा विश्वास दिला.
विशाल परब यांनी नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिली. संकटात सापडलेल्या कार्यकर्त्याला तत्काळ आर्थिक मदत करून त्यांनी केवळ राजकारण नव्हे, तर माणुसकीचेही दर्शन घडविल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी आरवलीचे सरपंच समीर कांबळी, उपसरपंच किरण पालयेकर, सागरतीर्थचे सरपंच एकनाथ कुडव, आरवलीचे माजी सरपंच तातोबा कुडव, शिरोड्याचे माजी सरपंच मनोज उगवेकर, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीकांत कर्पे, शेखर गोडकर, महादेव नाईक, मिलिंद साळगांवकर आणि तुषार रगजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी मदतीचा हात देण्याची परंपरा भाजपा युवा नेते विशाल परब सातत्याने जपत असून, त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे साळगांवकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.



