आजगाव : गोवा राज्य परिवहन महामंडळाची (कदंबा) पणजी–शिरोडा–वेंगुर्ला ही बस आज सायंकाळी आजगाव येथील वाघबीळ परिसरातील धोकादायक वळणावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला कलंडली. या बसमध्ये सुमारे ४५ प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील पणजी येथून सायंकाळी साडेचार वाजता सुटलेली कदंबा बस शिरोडामार्गे वेंगुर्ल्याच्या दिशेने येत होती. आजगाव येथील वाघबीळाजवळील धोकादायक वळणावर समोरून एक चारचाकी वाहन येत असताना अचानक एका दुचाकीस्वाराने धोकादायक पद्धतीने वाहन पुढे घातले. त्याला धडक लागू नये म्हणून बसचालकाने प्रसंगावधान राखत बस वळविली. यावेळी बस रस्त्याच्या कडेला कलंडली.
बस ज्या ठिकाणी कलंडली, तेथून अवघ्या काही फुटांवर सुमारे २०० फूट खोल दरी असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र चालकाच्या समयसूचकतेमुळे बस दरीत कोसळण्यापासून बचावली आणि मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतर चालक धनंजय आसोलकर आणि वाहक सर्वेश नाईक यांनी तत्काळ आपत्कालीन दरवाजा उघडून सर्व ४५ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, ज्याला वाचवण्यासाठी बसचालकाने हा प्रयत्न केला तो दुचाकीस्वार आपली दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाल्याचे सांगण्यात आले.
चालकाच्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे ४५ प्रवाशांचे प्राण वाचल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे.



