ज्ञानदीपांनी उजळला सिंधुदुर्ग!, जिल्ह्यातील आठ कर्तृत्ववान शिक्षकांना ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ जाहीर. ; शैक्षणिक कार्य, नावीन्यपूर्ण उपक्रम अन् शाळा विकासातील योगदानाची दखल, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडून पुरस्कारांची घोषणा.

सिंधुदुर्ग : विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देत, त्यांच्या यशाला पंख देणाऱ्या आणि ग्रामीण भागातील शिक्षणाची वाट अधिक प्रकाशमान करणाऱ्या सिंधुदुर्गातील आठ कर्तृत्ववान शिक्षकांच्या कार्यावर जिल्हा परिषदेने कौतुकाची मोहोर उमटवली आहे. जिल्हा परिषदस्तरीय ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली असून, जिल्ह्यातील आठ शिक्षकांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली.

शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा शिल्पकार असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने झटणाऱ्या, शिक्षणात नावीन्यपूर्ण प्रयोग राबविणाऱ्या आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली आहे.

तालुकानिहाय प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे जिल्हास्तरीय निवड समितीने निकषांच्या आधारे मूल्यमापन केले. प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. त्यानंतर संबंधित प्रस्तावांना विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर आठ शिक्षकांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

‘उत्कृष्ट शिक्षक’ म्हणून यांची निवड –

कणकवली तालुक्यातून सुशांत सुभाष भमजी,
सावंतवाडी तालुक्यातून निता नितीन सावंत,
दोडामार्ग तालुक्यातून रामा भिवा गवस,
वेंगुर्ला तालुक्यातून प्राजक्ता प्रशांत आपटे,
कुडाळ तालुक्यातून अस्मिता अविनाश कुडाळकर,
देवगड तालुक्यातून उत्तम नामदेव मोहिते,
वैभववाडी तालुक्यातून दत्ताराम शांताराम माईणकर,
तर मालवण तालुक्यातून उन्नती बाळकृष्ण कराळे यांची ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ासाठी निवड करण्यात आली आहे.

या शिक्षकांनी आपल्या अध्यापनातून केवळ अभ्यासक्रम पूर्ण केला नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेची ज्योत तेवत ठेवली. विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थीकेंद्री अध्यापन पद्धती, शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी घेतलेली मेहनत यामुळे त्यांच्या कार्याला जिल्हास्तरीय सन्मानाची पावती मिळाली आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांना रोख रक्कम, जिल्हा पुरस्कार, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांच्या कार्यामागे खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या पती-पत्नीचाही सन्मान करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत.

शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव! 

आठही शिक्षकांच्या निवडीची घोषणा होताच जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान म्हणजे केवळ व्यक्तीचा गौरव नसून ग्रामीण शिक्षणव्यवस्थेला समृद्ध करणाऱ्या सेवाभावी वृत्तीचा गौरव आहे.

या आठ शिक्षकांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेला आदर्श जिल्ह्यातील इतर शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून, त्यांच्या ज्ञानसेवेचा हा गौरव अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला नवी प्रेरणा देणारा ठरेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles