सावंतवाडी : सत्तेपुरते नव्हे, तर राष्ट्रउभारणीचे राजकारण करणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०४७ च्या विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी गावागावातील भाजप संघटन अधिक मजबूत करा. केंद्रातील सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पार्लमेंट टू पंचायत’ प्रत्येक पातळीवर भाजपची सत्ता आणि सक्षम संघटन आवश्यक आहे, असा जोरदार एल्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.
भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अतुल काळसेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रउभारणीच्या ध्येयाने भाजपचा कार्यकर्ता काम करतो!
भाजप हा केवळ सत्ता मिळविण्यासाठी राजकारण करणारा पक्ष नसून, देश आणि देशाच्या भवितव्याचा विचार करणारे नेतृत्व पक्षाकडे आहे. राष्ट्रउभारणीत योगदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता करीत आहे. त्यामुळे २०४७ च्या विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांच्या दिशेने कार्य करावे, असे आवाहन आ. चव्हाण यांनी केले.
केवळ दिल्लीमध्ये सरकार असणे पुरेसे नाही. केंद्र सरकारच्या योजना, विकासाचा निधी आणि लोककल्याणकारी धोरणांचा लाभ गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी पंचायत स्तरापासून सक्षम संघटन आणि सक्षम लोकप्रतिनिधी निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोडशेडिंगपासून ‘हर घर जल’पर्यंत विकासाचा वेग!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करीत आहे. राज्यातील लोडशेडिंग संपुष्टात आणणे, ‘हर घर जल’च्या माध्यमातून घराघरांत पाणी पोहोचविणे, सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणे तसेच ई-२०सारख्या आधुनिक संकल्पनांची अंमलबजावणी ही सरकारच्या विकासाभिमुख कार्याची उदाहरणे आहेत, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.
भाजप हा राष्ट्रहित जोपासणारा पक्ष आहे. दुसरीकडे विरोधक केवळ टीआरपी आणि फेक नरेटिव्हच्या राजकारणात अडकले आहेत. मात्र, भाजपची लढाई २०४७ च्या विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी आहे. त्यामुळे विरोधकांच्या फेक नरेटिव्हला चोख प्रत्युत्तर देत सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘पार्लमेंट टू पंचायत’ विजयाची साखळी गावागावात मजबूत करा!
भाजपने ‘पार्लमेंट ते पंचायत’ अशा विविध स्तरांवर आपली ताकद सिद्ध केली आहे. भाजपची देशाला गरज का आहे, पक्षाची विकासाची दिशा काय आहे आणि सरकारच्या योजना जनतेच्या जीवनात कसा बदल घडवत आहेत, हे तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे हे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.
किसान क्रेडिट कार्ड मिळवून देण्यासाठी भाजपने केलेले योगदान तसेच जिल्हा बँकेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती शेतकरी व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही आ. चव्हाण यांनी केले.
‘सशक्त भारतासाठी सशक्त भाजप’ ही काळाची गरज असून, संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कटिबद्ध राहण्याचा संकल्प करावा, असे त्यांनी सांगितले.
मच्छिमारांना ‘शेतकरी’ दर्जा; नितेश राणेंच्या कार्याला प्रदेशाध्यक्षांची दाद!
दरम्यान, पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागातील कार्याचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र, मच्छिमारांना कर्जमाफी व इतर सवलतींचा लाभ मिळविताना काही अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत राज्याच्या मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ना. नितेश राणे यांनी किनारपट्टीवरील मच्छिमारांना शेतकरी म्हणून दर्जा मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम केले, असे गौरवोद्गार आ. चव्हाण यांनी काढले.
मच्छिमारांच्या प्रश्नांची जाण ठेवून त्यांना मुख्य प्रवाहातील कृषी क्षेत्राशी जोडण्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही ना. नितेश राणे प्रभावीपणे काम करीत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक जोमाने वाढत आहे, असेही आ. चव्हाण यांनी आवर्जून सांगितले.
सिंधुदुर्गातून विकसित महाराष्ट्राचा संकल्प!
सिंधुदुर्गच्या मातीतून संघटनशक्ती, विकास आणि राष्ट्रहिताचा संदेश अधिक बुलंद करण्याचा निर्धार या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत व्यक्त झाला. गावागावात भाजपची बूथरचना मजबूत करणे, शासनाच्या योजना घराघरात पोहोचविणे आणि २०४७ च्या विकसित भारताच्या संकल्पनेला जनचळवळीचे स्वरूप देणे, यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला.



