सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पक्षशिस्तीचा बडगा उगारल्यानंतर आता काही पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या १३ पदाधिकाऱ्यांचे पक्षीय निलंबन रद्द करण्याचा निर्णय भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाहीर केला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत काही पदाधिकाऱ्यांवर पक्षीय निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संबंधितांपैकी काही पदाधिकाऱ्यांनी आपली चूक लक्षात येताच निलंबन रद्द करण्यासाठी पक्षाकडे विनंती अर्ज केला होता.
या पार्श्वभूमीवर पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार संबंधितांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या निर्णयानुसार या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा पक्षकार्यासाठी संधी देण्यात आली आहे.
निलंबन रद्द झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नितीन एकनाथ राऊळ, डायगो (मायकल) फ्रान्सिस डिसोजा, सुजाता अजित पडवळ, जितेंद्र पांडुरंग गावकर, शर्वाणी शेखर गावकर, स्वप्नील यशवंत नाटेकर, योगेश अशोक केणी, उल्हास उत्तम परब, स्नेहल संदीप नेमळेकर, साक्षी संदीप नाईक, सुप्रिया शैलेश नाईक, प्रवीण नारायण गवस आणि अनिकेत फाटक यांचा समावेश आहे.
“पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असून, चुकलेल्या पदाधिकाऱ्यांना सुधारण्याची संधी देत त्यांना पुन्हा पक्षकार्यासाठी सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असा संदेश या निर्णयातून भाजप नेतृत्वाने दिला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली नाराजी दूर करून संघटनात्मक एकजूट अधिक मजबूत करण्याच्या दिशेने भाजपने अत्यंत सकारात्मक पाऊल टाकलं आहे. पक्षांतर्गत मतभेदांना पूर्णविराम देत आगामी राजकीय आव्हानांसाठी कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येत आहे.



