तळेरे : तळेरे व पंचक्रोशीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘चैतन्य नर्सिंग होम ऑर्थोपेडिक अँड इन्फर्टिलिटी सेंटर’चा शुभारंभ शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याला सौ. नीलमताई राणे, राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन १९९६ मध्ये डॉ. मिलिंद कुलकर्णी आणि डॉ. ऋचा कुलकर्णी यांनी तळेरे येथे चैतन्य नर्सिंग होमच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेचा प्रारंभ केला. गेल्या तीन दशकांच्या प्रवासात या रुग्णालयाने १२ हजारांहून अधिक प्रसूती केल्या असून हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली आहे. तळेरे येथे सिझेरियन शस्त्रक्रियेची सुविधा सुरू करणारे पहिले रुग्णालय म्हणूनही चैतन्य नर्सिंग होमने विशेष ओळख निर्माण केली आहे.
याच सेवाभावी परंपरेचा विस्तार करत नव्या केंद्रामध्ये अस्थिरोग उपचार, वंध्यत्व निवारण, विविध वैद्यकीय तपासण्या आणि फिजिओथेरपी अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. ऋचा कुलकर्णी, डॉ. मनस्वी कुलकर्णी-भोसले आणि डॉ. मोहित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा दिल्या जाणार आहेत.
वंध्यत्व उपचारांसाठी ART लेव्हल १ केंद्राच्या मान्यताप्राप्त कार्यकक्षेतील सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अस्थिरोग विभागात हाडे व सांध्यांचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी तसेच सांधे प्रत्यारोपणासंबंधी उपचारांची सुविधा असेल.
शस्त्रक्रियांसाठी तीन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स उभारण्यात आली असून त्यापैकी दोन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत. याशिवाय सी-आर्म मशीन, एअर हँडलिंग युनिट, लॅमिनार फ्लो आणि स्वतंत्र सीएसएसडी निर्जंतुकीकरण कक्ष अशा आधुनिक तांत्रिक सुविधांचा समावेश आहे.
डॉ. संजय सावंत (एम.डी. पॅथॉलॉजी) यांच्या मार्गदर्शनाखाली पॅथॉलॉजी लॅबसह ४डी सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, २डी इकोकार्डिओग्राफी आणि आधुनिक उपकरणांनी सुसज्ज फिजिओथेरपी विभागही सुरू करण्यात आला आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार नारायणराव राणे यांनी कुलकर्णी कुटुंबीयांचे अभिनंदन केले. कोणताही व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करताना त्याचा परिसरातील नागरिकांना लाभ व्हावा आणि समाजहित साधले जावे, ही अपेक्षा असते. रुग्णालयाच्या बाबतीत येथे उपचारासाठी येणारा प्रत्येक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतावा, हीच खरी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ रुग्णालय सुरू करणे महत्त्वाचे नसून येथे येणाऱ्या रुग्णांना उत्तम आणि दर्जेदार उपचार मिळणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तळेरे येथे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध झाल्यामुळे परिसरासह जिल्ह्यातील नागरिकांची आरोग्यसेवेसाठी दूरवर जाण्याची गैरसोय कमी होईल. नागरिकांनी या सुविधेचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. मिलिंद कुलकर्णी व डॉ. ऋचा कुलकर्णी यांची कन्या डॉ. मनस्वी कुलकर्णी-भोसले आणि जावई डॉ. मोहित भोसले यांनी उच्च वैद्यकीय शिक्षणानंतर मोठ्या शहरांमध्ये स्थायिक होण्याऐवजी ग्रामीण भागात राहून वैद्यकीय सेवा देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यात कोणत्याही अडचणी आल्यास किंवा मदतीची आवश्यकता भासल्यास संपूर्ण राणे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी आपल्या गावात परतून उद्योग-व्यवसाय आणि समाजोपयोगी सेवांच्या माध्यमातून गावाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सौ. नीलमताई राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनीही संपूर्ण कुलकर्णी कुटुंबीयांचे अभिनंदन करून चैतन्य नर्सिंग होमच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*उच्च शिक्षणानंतर गावातच सेवा देण्याचा आदर्श निर्णय!*
डॉ. मनस्वी कुलकर्णी-भोसले आणि डॉ. मोहित भोसले यांनी शहरातील संधींपेक्षा आपल्या गावात राहून स्थानिक नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्याला प्राधान्य दिले आहे. उच्च शिक्षण आणि वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यहितासाठी करण्याची त्यांची भूमिका निश्चितच प्रेरणादायी आहे. केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता आपल्या परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा संकल्प या नव्या केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत आहे. नव्या पिढीनेही उच्च शिक्षण घेऊन आपल्या गावाकडे परतावे आणि स्थानिक पातळीवर सेवा व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून मिळतो.
तळेरेचे भौगोलिक स्थान लक्षात घेता राजापूर ते कणकवली आणि विजयदुर्ग ते गगनबावडा या विस्तृत परिसरातील नागरिकांसाठी हे केंद्र आधुनिक आरोग्यसेवेचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरण्याची अपेक्षा आहे. मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर मिळण्याचा मार्ग यामुळे सुकर होणार असून परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी केले, तर शशांक तळेकर यांनी आभारप्रदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. ऋचा कुलकर्णी, डॉ. मोहित भोसले, डॉ. मनस्वी कुलकर्णी-भोसले आणि मंगेश भोसले यांनी केले. या सोहळ्याला तळेरे ग्रामस्थांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘विश्वास तीन दशकांचा, संकल्प आधुनिक आरोग्यसेवेचा आणि ध्यास निरोगी भविष्याचा!’** या ध्येयाने सुरू झालेल्या चैतन्य नर्सिंग होमच्या नव्या पर्वामुळे तळेरे आणि पंचक्रोशीतील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळणार आहे. तीन दशकांच्या विश्वासार्ह वैद्यकीय सेवेचा वारसा जपत नव्या पिढीने त्याला दिलेली आधुनिकतेची जोड तळेरेच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



