मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचे पाऊल उचलत उंच इमारतीवरून उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे. अनिल अरोरा यांचे पार्थिव वांद्रे येथील डॉ. भाभा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.
मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येमागील ठोस कारण समोर आले नाही. मागील वर्षी अनिल अरोरा यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब भारताच्या सीमेवर वसलेल्या फाजिल्का येथील रहिवासी होते. अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले. मलायका 11 वर्षांची असताना अनिल अरोरा आणि जॉयस यांचा घटस्फोट झाला असल्याचे मलायकाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते.
मलायका पुण्याहून मुंबईसाठी रवाना…
अभिनेत्री मलायका अरोरा ही काही कामानिमित्ताने पुण्यात होती. या घटनेची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईसाठी रवाना झाली. या घटनेची माहिती मिळताच अरोरा कुटुंबातील सदस्यांना धीर देण्यासाठी मलायकाचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान हा अरोरा यांच्या घरी दाखल झाला