पुणे : राज्यातील अनेक ठिकाणी तिकीट कापल्याने उमेदवारांची रडारड संपूर्ण देशाने पाहिली. हट्टाला, ईरेला पेटलेल्या उमेदवारांची समजूत घालताना पक्षश्रेष्ठींच्याही नाकीनऊ आल्याचे दिसून आले. थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना या बंडोबांना शांत करण्यासाठी फोन करावा लागला. पक्ष श्रेष्ठींनी त्यांना भविष्यात काही तर लाभ देण्याचे आश्वासन दिले. पण दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये दोन उमेदवार अत्यंत भाग्यवंत ठरले आहेत. कारण त्यांना एका नव्हे तर दोन पक्षांनी उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी त्यांनी एबी फॉर्म सुद्धा दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकाचं जागेसाठी दोन पक्षांकडून उमेदवारी मिळालेले दोन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 20 ‘ब’ आणि 30 ‘अ’ जागेवर हा पेच निर्माण झालाय. नीलम म्हात्रे यांना प्रभाग 20 मधील ब जागेसाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेकडून एबी फॉर्म घेतले आहे.तसेच संदीप गायकवाड यांना प्रभाग 30 मधील ‘अ’ जागेसाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेनं ही एबी फॉर्म घेतले.
आता या दोघांनी एकाचं पक्षाचे एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं. मात्र या दोघांनी दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म दाखल केले आणि छाननीमध्ये दोन्ही अर्ज वैध ठरलेत. त्यावेळी या दोघांकडे एका पक्षाचा एबी फॉर्म मागे घेण्याची वेळ होती. मात्र या दोघांनी ती प्रक्रिया राबवली नाही. त्यामुळं या दोघांकडे अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत एका पक्षाची उमेदवारी मागे घेण्याचा पर्याय असेल.


