सावंतवाडी: शहरात बुधवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास रस्त्यावरून चालत असताना कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाने अन्विता सावंत ( वय 55) या महिलेला मागून जोरदार टक्कर दिली असता तिच्या उजव्या पायाला तसेच कमरेखालील भागाला फ्रॅक्चर झाले. तसेच बरगड्यांना देखील मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. नशीब बलवत्तर म्हणून दुसरी महिला श्रीमती भोसले या थोडक्यात बचावल्या. परंतु अपघातानंतर कारचालक मात्र तेथून पसार झाला.
दरम्यान त्याच भागातील उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी तेथील ग्रामस्थ हरीश कोटेकर यांच्या रिक्षेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सदर जखमी महिलेला दाखल केले असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, रूपा मुद्राळे, रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी त्या महिलेवर प्राथमिक उपचारासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच तिचे नातेवाईक आल्यानंतर तिला डॉक्टरांच्या सल्ल्याने अधिक उपचारासाठी तत्काळ गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले आहे. त्यावेळी सावंत यांच्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकीच्या सदस्यांचे व ॲड. निरवडेकर यांचेही आभार मानले. श्रीमती सावंत या आरपीडी हायस्कूलमध्ये लिपिक पदावर कार्यरत असल्याचे समजते.



