सिंधुदुर्ग: पर्यटन मंत्रालय,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आसमंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १८ जानेवारी या कालावधीत अंबर हॉल रत्नागिरी येथे आयोजित केलेला सागर महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यासाठी
देशातील समुद्र विज्ञानातील निष्णात शास्त्रज्ञ,नामवंत शिक्षणतज्ञ, उपक्रमशील शिक्षक तसेच राज्यातील हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विज्ञान प्रेमी उपस्थित होते.
पुराण काळातील अमृत मंथन प्रमाणे आधुनिक काळात सागरासंबंधी विचारांचे मंथन करणाऱ्या या सागर महोत्सवाच्या निमित्ताने समुद्री अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हरित क्रांती, श्वेत क्रांती नंतर आता नील क्रांतीचे युग येत असून त्यात भारतीय युवकांना प्रचंड संधी असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मश्री डॉ शैलेश नायक यांनी व्यक्त केले.
देशाला हजारो किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे पण आजतागायत त्याप्रमाणात सागर संवर्धनासंबंधी जाणीव जागृती झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

या महोत्सवात ओशिनोग्राफीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पद्मश्री डॉ शैलेश नायक , डॉ इंगोले,डॉ डामरे यांसारख्या अनेक ऋषितुल्य वैज्ञानिकांचे सागरी जैवविविधते संबंधी व्याख्यान, विज्ञान भारतीचे अध्यक्ष तथा पुणे विद्यापीठाचे ज्ञानमहर्षी डॉ शेखर मांडे यांचे क्लायमेट चेंज याविषयी मार्गदर्शन, वैद्यकीय उपचारापासून ते खनिकर्मच्या क्षेत्रात कार्यरत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसिनोग्राफी या भारतातील अग्रगण्य संस्थेचे मार्गदर्शन या बरोबरच मॅनग्रूव, शोअर वॉक,डॉक्युमेंटरी, पथनाट्य,जखमी कासवांची काळजी घेणाऱ्या डॉ दिनेश विन्हेरकर यांची मुलाखत, बायो एन्झाईम कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक, तरुण शास्त्रज्ञांचे अनुभवकथन अशा अनेक रंजक गोष्टींची रेलचेल यामुळे नवतरुणांना एक वेगळा अनुभव तर मिळालाच तसेच करियरची वेगळी वाटही समजली. यानिमित्त समुद्र विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज व्यक्तींची प्रत्यक्ष भेट तसेच पर्यावरण साक्षरता संदर्भात भरीव कार्य करत असलेले आसमंतचे पदाधिकारी नंदकुमार पटवर्धन, जगदीश खेर,नितीन करमरकर , पुरुषोत्तम पेंडसे आणि त्यांचे सहकारी यांचे कार्य जवळून पाहता आले.
या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, जिल्हा संघटक सत्यपाल लाडगावकर, कोषाध्यक्ष राजाराम फर्जंद, सदस्य पृथ्वीराज बर्डे,संजय तुळसकर,पृथ्वीराज बर्डे,
कणकवली तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, देवगड तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सतिशकुमार कर्ले,सचिव सागर फाळके, सदस्य तन्मय कोठावळे,जोईल, सागर कोकरे,वैभववाडी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अविनाश कांबळे,दोडामार्ग तालुका विज्ञान मंडळाचे सचिव अरुण सावंत,सदस्य नरेंद्र शिंपी, असरोंडी मुख्याध्यापक विद्यालयाचे सुशांत पाटील,माजगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चवरे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाने आजतागायत विज्ञानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर,शिक्षण विभाग सिंधुदुर्ग व शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन, विज्ञान नाट्य महोत्सव, राज्यस्तरीय विज्ञान मेळावा यशस्वीपणे आयोजन करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले असून गोवा सायन्स सेंटरच्या मदतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगांची प्रत्यक्ष हाताळणी करता यावी यासाठी सायन्स ऑन व्हील , विज्ञान विषयाच्या अध्यापनात पूरक तज्ञांची व्याख्याने, वैज्ञानिक सहली, क्षेत्रभेटी,स्पर्धा परीक्षा सराव,शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान असे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा वाढण्यास प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. आजवर मंडळाच्या अनेक विज्ञान शिक्षकांची राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी झाली असून या सागर महोत्सवानिमित्त मंडळाच्या अनेक सदस्यांनी सागर संपत्ती व जैवविविधता यासंबंधी चर्चासत्रात सक्रीय सहभाग घेऊन विचारांची देवाण घेवाण केली तसेच पुढीलवर्षी हा महोत्सव सिंधुदुर्गमध्ये आयोजन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कोकणची लाइफ लाइन असलेल्या सागरासंबंधी असलेल्या या राज्यस्तरीय सागर महोत्सवसाठी जिल्हा विज्ञान मंडळ सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव उज्वल केल्याबद्दल राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूरचे संचालक राजकुमार अवसरे, कोल्हापूर विभागीय शिक्षण संचालक प्रभावती कोळेकर,
विभागीय विज्ञान पर्यवेक्षक समरजीत पाटील, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर,डाएटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे पदाधिकारी,शिक्षक संघटना तसेच विज्ञान प्रेमींकडून या टीमचे अभिनंदन होत आहे.



