कुडाळ : कोकण एनजीओ इंडिया आणि अमेरिका-आधारित व्हिटॅमिन एंजेल्स यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव या गावातून या महिन्यापासून महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रमाची सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत ६ वर्षांखालील सुमारे ५,००० बालकांना व्हिटॅमिन ए आणि अल्बेंडाझोल गोळ्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

व्हिटॅमिन ए मुळे मुलांची दृष्टी सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते व कुपोषणाशी लढण्यास मदत होते. अल्बेंडाझोल गोळीमुळे आतड्यांतील जंतनाश होऊन मुलांची भूक, वजनवाढ आणि एकूण शारीरिक विकास सुधारतो. त्यामुळे बालआरोग्य अधिक सक्षम होऊन भविष्यातील आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
आज या उपक्रमाची सुरुवात अंगणवाडीतील बालकांसोबत करण्यात आली. या सत्राचे नेतृत्व गौरव चौहान, गौरी आडेलकर आणि शुभम लोणाग्रे यांनी केले. कोकण एनजीओची संपूर्ण टीम सिंधुदुर्गातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी उत्साहाने कार्यरत आहे.
हा उपक्रम जिल्ह्यातील बालआरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार असून, निरोगी सिंधुदुर्ग घडविण्याकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे कोकण संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले



