कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आणि सावंतवाडी शहरालगत असलेल्या आकेरी येथील जागृत देवस्थान, श्री देव रामेश्वर यांचा प्रसिद्ध वार्षिक रथोत्सव उद्या मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. त्यापूर्वी रविवार, १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी
मंदिरात १२ फेब्रुवारीपासूनच उत्सवाला सुरुवात झाली असून, दररोज रात्री पुराण वाचन आणि पालखी सोहळा साजरा केला जात आहे.
रविवार, १५ फेब्रुवारी (महाशिवरात्र): पहाटे ५ वाजल्यापासून अभिषेक, गारहाणे आणि पूजा अर्चा विधी सुरू आहेत.
१७ फेब्रुवारी रोजी भव्य रथोत्सव सोहळा –
उत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या मंगळवारी सायंकाळपासून कार्यक्रमांची विशेष रंगत पाहायला मिळेल:सायंकाळी ४ वाजता: सुश्राव्य गीत गायनाचा कार्यक्रम.रात्री: ढोल-ताशांच्या गजरात श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल.रथोत्सव: पालखीनंतर या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला रथोत्सव सोहळा दिमाखात संपन्न होईल.
सांगता: उत्सवाची सांगता श्री यक्षणी दशावतार नाट्य मंडळ (माणगाव) यांच्या दशावतारी नाटकाने होणार आहे. “महाशिवरात्र आणि रथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा,” असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, आकेरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.



