कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्यस्तरीय महिला अधिवेशन वणंद येथे दिमाखात संपन्न.

रत्नागिरी : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दि. ८ मार्च २०२६ रोजी महिलांचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन माता रमाई राष्ट्रीय स्मारक, वणंद (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरीत्या पार पडले.
अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. आकाश तांबे होते. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी स्त्रीशक्तीच्या सन्मानासोबतच माता रमाई यांच्या त्याग, संयम आणि निःस्वार्थ कार्याची आठवण करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामागे रमाईंचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “स्त्री फक्त घर सांभाळत नाही, तर इतिहास घडवते,” असा संदेश त्यांनी उपस्थित महिलांना दिला.
तसेच शिक्षणाची मशाल पुढे नेणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, संघटन आणि समाजकार्यात सक्रिय सहभाग घेणे तसेच पुढील पिढीला योग्य संस्कार देणे ही आजच्या महिलांची प्रमुख जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अधिवेशनास प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती नीलिमा नाईक उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांसमोरील आव्हाने व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्त्या श्रीमती सरोज पैठणे यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून दिला.
कार्यक्रमात उपशिक्षणाधिकारी श्रीमती शिरभाते, वनंद गाव महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती प्रिया कदम, श्रीमती समीरा धोत्रे, पोलिस पाटील सोनाली काते यांच्यासह विविध मान्यवर महिलांचा कास्ट्राईब संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या अधिवेशनाला संघटनेचे राज्य व विभागीय पदाधिकारी तसेच विविध जिल्ह्यांतील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक आकर्षक, प्रेरणादायी व यशस्वी ठरला.


अधिवेशनात राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १०० महिला शिक्षकांना “माता रमाई आदर्श शिक्षिका पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप वाघोदे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली तालुक्याने अधिवेशनाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. रत्नागिरी जिल्हा सहसचिव श्री. प्रमोद गमरे (मुख्याध्यापक) तसेच तालुका अध्यक्ष श्री. बिपीन यशवंत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व सभासदांनी एकत्रित प्रयत्न करून अधिवेशन यशस्वी केले.
राज्यातील विविध जिल्हे व तालुक्यांतून उपस्थित राहिलेल्या महिला सदस्य, सभासद, मान्यवर पाहुणे तसेच स्थानिक माता रमाई महिला मंडळ यांच्या सक्रिय सहभागामुळे अधिवेशन अधिक भव्य-दिव्य स्वरूपात पार पडले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित हे अधिवेशन स्त्रीशक्तीला प्रेरणा देणारे व समाजपरिवर्तनाचा संदेश देणारे ठरले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles