सावंतवाडी : जिल्हा वार्षिक योजनेतील अनुसूचित जाती उपाययोजनेतून तळवणे दलित वस्तीच्या नावाखाली उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा पथदीप प्रकरणाने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. दलित वस्तीला प्रकाश मिळावा या उद्देशाने मंजूर झालेला पथदीप प्रत्यक्षात वस्तीपासून दूर बसविण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते वासुदेव जाधव यांनी केला असून, या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी त्यांनी केली आहे.
जाधव यांनी पंचायत समिती सावंतवाडी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, शासन विविध योजनांद्वारे दलित वस्त्या प्रकाशमय करण्यासाठी पथदीप उभारते. त्यानुसार तळवणे येथील चर्मकार समाजाच्या एकमेव घराजवळ पथदीप मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्षात हा पथदीप त्या घरापासून तब्बल 300 ते 400 मीटर अंतरावर उभारण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांच्या नावावर हा निधी मंजूर झाला, त्यांनाच त्याचा काहीच फायदा होत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, या कामासाठी सुमारे 7 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात असून, लाभ मात्र इतरत्र वळवल्याचा आरोप होत आहे. “गणपती एका बाजूला आणि फुगडी दुसऱ्या बाजूला” अशीच परिस्थिती या पथदीपाची झाल्याची बोचरी टीका जाधव यांनी केली आहे.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि पथदीप दलित वस्तीतच बसवावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही जाधव यांनी दिला आहे.



