खड्ड्यांचा जीवघेणा कहर!, सावंतवाडी – पीशिरोडा मार्गावर थरारक अपघात! ; दशावतार कलाकार थोडक्यात बचावले.

-:सचिन मोरजकर
सावंतवाडी : सावंतवाडी-शिरोडा मार्ग पुन्हा एकदा जीवघेणा ठरत असल्याचे समोर आले आहे. माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी स्थळासमोर आज सायंकाळी सुमारे ६:१५ वाजता खड्ड्यांच्या विळख्यात अडकून एक भीषण अपघात घडला.


गिरगाव (ता. कुडाळ) येथील ‘सिंधू कला नाट्य मंडळ’ या प्रसिद्ध दशावतार मंडळाचे कलाकार कार्यक्रम आटोपून परतत असताना त्यांच्या टाटा मॅजिक (सहासीटर) वाहनाने रस्त्यातील प्रचंड खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी अचानक उसळल्याने चालकाचा ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या कंटेनरवर ती जोरात आदळली.
या भीषण धडकेत टाटा मॅजिकचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. चालक गंभीर जखमी झाला असून, गाडीत बसलेले इतर दशावतार कलाकार थोडक्यात बचावले — काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढत तातडीने रुग्णालयात हलवले.

खड्डेच ठरले मृत्यूचे कारण?
या मार्गावरील खोल आणि जीवघेण्या खड्ड्यांमुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांकडून जोर धरत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशासन झोपेत? नागरिकांचा संताप उसळला!
“रस्त्यांची दुरवस्था हीच अपघातांना आमंत्रण देत आहे,” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून, तात्काळ दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच प्रश्न निर्माण होतो आहे, किती बळी घेतल्यावर प्रशासन जागे होणार?

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles