सुभेदारांच्या इशाऱ्यानंतर पालिका खडबडली, खासकीलवाड्यात रखडलेल्या विकासकामांना गती. ; आशिष सुभेदार यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाची हालचाल, पाईलाइन फुटीवरूनही संताप.

सावंतवाडी : खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागातील रखडलेल्या विकासकामांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी आवाज उठवल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रभागातील विविध विकासकामांना अखेर सुरुवात करण्यात आली आहे.
या प्रभागात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांतील गटबाजीमुळे अनेक विकासकामे ठप्प झाल्याचा आरोप सुभेदार यांनी केला होता. ठेकेदार व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काही कामे अर्धवट अवस्थेत असून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
ठिकठिकाणी पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच कचऱ्याची दुर्गंधी, स्ट्रीट लाईटची अपूर्ण कामे, गटार बांधकाम रखडणे, झाडी तोडणी न होणे अशा अनेक समस्या प्रभागात निर्माण झाल्या आहेत. अनेक विकासकामांची टेंडर प्रक्रिया व वर्क ऑर्डर पूर्ण होऊनही पालिकेतून कामे सुरू न करण्याचे आदेश देण्यात आल्याने कामे रखडल्याचा आरोपही सुभेदार यांनी केला.
पावसाळा तोंडावर आला असताना अर्धवट कामांमुळे पाणी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. कामे तातडीने पूर्ण न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या.
दरम्यान, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चुकीच्या खोदाईदरम्यान शनिवारी ज्युस्तीन नगर कमानीसमोर पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाणीटंचाईच्या काळात अशा घटना नागरिकांच्या हिताच्या नसून प्रशासन व ठेकेदारांनी याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सुभेदार यांनी केली.
पाणी समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास संतप्त नागरिकांसह नगरपरिषदेवर ‘घागर मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles