आई – बाबा कधीचं मरत नाहीत!, ते देवाचं पृथ्वीवरील जिवंत रूप! ; जागतिक मातृदिनानिमित्त हृदयस्पर्शी संपादकीय लेख.

✍️ प्रा . रुपेश पाटील. 

वाचक मित्रहो!,

आज पवित्र अशा मातृदिनाच्या जगातील तमाम मात्र शक्तीला वंदन!
“स्वामी तिन्ही जगाचा… आईविना भिकारी!”
ही केवळ म्हण नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाचा पाया आहे. आई म्हणजे मंदिरातील अखंड तेवत राहणारी समई…
तर वडील म्हणजे आयुष्याच्या वादळातही न डगमगणारा वटवृक्ष…
आई म्हणजे मायेचा महासागर…
तर बाबा म्हणजे संकटांवर छाती ठोकून उभा राहणारा हिमालय!
संत तुकाराम महाराज म्हणतात —
“आई-वडिलांची सेवा हीच खरी पांडुरंगाची पूजा.”
संत ज्ञानेश्वरांनी आईला पृथ्वीची उपमा दिली; कारण पृथ्वीप्रमाणेच आई सर्व सहन करते, पण लेकरांना दुःखाची झळ लागू देत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज घडवताना जिजाऊंनी केवळ पुत्र घडवला नाही, तर संपूर्ण स्वराज्याच्या स्वप्नाला आकार दिला.
म्हणूनच इतिहास सांगतो —
“महान व्यक्तींच्या यशामागे आईच्या संस्कारांचा हात असतो.”
आई-बाबा कधीच मरत नाहीत…!
आई-बाबा कधीच मरत नाहीत…
ते आपल्या प्रत्येक श्वासात जिवंत असतात.
आपल्या चालण्यात, बोलण्यात, हसण्यात, रागावण्यात…
आपल्या प्रत्येक सवयीत त्यांचा अंश दडलेला असतो.
आई गेल्यावर घरातील चुलीची ऊब हरवते…
बाबा गेल्यावर घराचं छप्परच निघून जातं…
आणि मग मोठमोठे बंगले असूनही घर ओसाड वाटू लागतं.
भिंती तशाच असतात…
दरवाजे तसेच असतात…
पण घरातला “जीव” निघून गेलेला असतो.
आजच्या धावपळीच्या युगात माणूस चंद्रावर पोहोचला…
पण स्वतःच्या आई-वडिलांच्या मनापर्यंत पोहोचायला मात्र कमी पडला!
“हम दो हमारे दो… माँ-बाप को फेंक दो!”
ही विकृत मानसिकता आज समाजाला पोखरत चालली आहे.
वृद्धाश्रमांची वाढती संख्या ही आधुनिकतेची नव्हे,
तर संवेदनांच्या मृत्यूची भयावह घंटा आहे.
आई-वडिलांना आपल्यापासून दूर करणारा मृत्यू नसतो…
ते असतं दुर्लक्ष…
ती असते उदासीनता…
तो असतो आपल्या व्यस्ततेचा स्वार्थी अंधार!
त्यांच्या थकलेल्या डोळ्यांना पैशांची गरज नसते…
त्यांना हवी असते फक्त आपल्या सहवासाची ऊब…
दोन प्रेमाचे शब्द…
आणि “तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत” ही भावना!

मंडळी,
कधी पाहिलं आहे का…?
लेक हसताना अचानक आईसारखी दिसते…
मुलगा मिशीत हसताना बाबांची छबी दिसते…
ताईच्या मायेतील आईची सावली…
दादाच्या आवाजात बाबांचा दरारा…
आई-वडील कधीच संपत नाहीत…
ते आपल्या रक्तात विरघळलेले असतात.
पण आपणच भावंड…
अहंकाराच्या भिंती उभ्या करतो…
भावंडांमध्ये दऱ्या निर्माण करतो…
त्यांनी आयुष्यभर जपलेलं घर आपण स्वतःच्या हट्टाने उद्ध्वस्त करतो…
आणि त्या प्रत्येक भांडणात आई-बाबा पुन्हा एकदा मरतात!

मित्रहो,  आज जागतिक मातृदिन आहे…
सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याचा दिवस नाही…
तर आईच्या सुरकुतलेल्या हातांवर प्रेमाने हात ठेवण्याचा दिवस आहे.
आज बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून विचारण्याचा दिवस आहे.
“खूप दमलात ना आयुष्यभर आमच्यासाठी…?”
आज एक संकल्प करूया –
आईवरून, बहिणीवरून शिवी देणं बंद करूया!
कारण “आई” हा शब्द शिवीचा नाही…
तर संपूर्ण सृष्टीतील सर्वात पवित्र मंत्र आहे.
चला…
सोडूया अहंकार…
जपूया नाती…
देऊया वेळ…
वाटूया प्रेम…
कारण —
“देव सगळीकडे पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली…
आणि त्या आईच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी वडील निर्माण केले!”
आणखी एक सत्य —
“जगात हजारो नाती मिळतील,
पण आई-वडिलांसारखं निस्वार्थ प्रेम कुठेच मिळणार नाही.”
शेवटी एवढंच…
आई-वडील हे घरातील देव असतात.
त्यांच्या चरणाशी स्वर्ग असतो.
त्यांच्या आशीर्वादात संपूर्ण आयुष्याचं सुख दडलं असतं.
म्हणून…
त्यांना वृद्धाश्रम नव्हे,
तर आपल्या हृदयात स्थान द्या.
कारण —
आई-बाबा कधीच मरत नाहीत…
आपण त्यांना विसरतो तेव्हाच ते मरतात!”
❝ जागतिक मातृदिनाच्या सर्वांना हृदयपूर्वक शुभेच्छा! ❞

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles