पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देणारे अशोक परब यांचा कुडाळ येथे गौरव!

सावंतवाडी : कुडाळ येथे आज मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या पाचव्या राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलनात वाफोली येथील पर्यावरणप्रेमी, पर्यावरण संरक्षक तसेच ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक अशोक परब यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या पर्यावरण संवर्धनासाठीच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
गेली अनेक वर्षे पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, सामाजिक जाणीव आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असलेल्या अशोक परब यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ जबाबदारी नसून ती भावी पिढ्यांसाठीची नैतिक बांधिलकी आहे, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून सातत्याने दिला आहे.
विशेष म्हणजे, समाजसेवेची आपली भावना अधिक व्यापक करत श्री. परब यांनी गेल्यावर्षी ओरोस मेडिकल कॉलेजला मरणोत्तर देहदान करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. मृत्यूनंतरही आपले शरीर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी उपयोगी पडावे, या त्यांच्या निर्णयामुळे सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच मानवसेवेचा हा विचार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेली बाजू अधोरेखित करतो.
राष्ट्रीय स्तरावरील या सन्मानामुळे वाफोली गावासह सावंतवाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रातून अशोक परब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या कार्यातून समाजातील तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी, अशी भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles