तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांवर कोमसापची मोहोर! ; पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा मालवण शाखाध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या हस्ते गौरव!

मालवण : तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा २०२६ शनिवार, दि. ६ जून रोजी कोल्हापूर येथील हॉटेल अयोध्या सभागृहात दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मालवण शाखेच्या साहित्यिकांनी उल्लेखनीय यश संपादन करत हॅट्ट्रिक साधली. या अभूतपूर्व यशाबद्दल कोमसाप मालवण शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर (गुरुजी) यांनी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा विशेष सत्कार करून त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला.
पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित असलेल्या सुरेश ठाकूर यांनी याच सभागृहात कोमसाप मालवण शाखेच्या वतीने सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर (दीपी), साहित्यिका उज्ज्वला धानजी तसेच ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय शिवराम हिर्लेकर (गुरुजी) यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र शशांक हिर्लेकर यांचा शाल, श्रीफळ आणि गोड भेटवस्तू देऊन सन्मान केला. या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थित साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी वि. स. खांडेकर मंच तथा कोकण संस्था, कोल्हापूरचे सचिव मोहन गावकर, आकाशवाणी केंद्र सिंधुदुर्गचे निवृत्त अधिकारी कहाळेकर, चंद्रशेखर धानजी, कुमारी अपर्णा जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कारांतर्गत कोमसापच्या साहित्यिकांना मिळालेल्या गौरवामध्ये दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहाला “सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह”, उज्ज्वला धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या लेखसंग्रहाला “सर्वोत्कृष्ट लेखसंग्रह”, तर ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय शिवराम हिर्लेकर यांच्या “कर्तव्यपूर्ती” या आत्मचरित्राला “सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र” हा बहुमानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


एकाच संस्थेच्या तीन साहित्यिकांनी विविध साहित्य प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविल्याने कोमसाप मालवण शाखेच्या साहित्यिक परंपरेला नवी उंची प्राप्त झाली आहे. या यशामुळे कोमसापच्या साहित्यिक चळवळीला नवे बळ मिळाले असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
कोमसाप मालवण शाखेने केलेल्या विशेष सन्मानामुळे तिन्ही पुरस्कारप्राप्त साहित्यिक भावूक झाले. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव होत असल्याने त्यांनी कोमसाप मालवण शाखा, तितिक्षा इंटरनॅशनल आणि सर्व साहित्यप्रेमींचे आभार व्यक्त केले. साहित्यिकांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles