माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांचे एक आवाहन अन् माणुसकीचे अनेक हात पुढे सरसावले. ; जखमी सागर केरकर यांना आपुलकीयुक्त मदतीचा आधार!

सावंतवाडी : संकटाच्या काळात धावून येणारी माणसं हीच खरी संपत्ती असते, याची प्रचिती पुन्हा एकदा सावंतवाडी तालुक्यात आली आहे. मडुरा येथील स्ट्रीट लाईटचा बल्ब बदलण्यासाठी जीव धोक्यात घालून खांबावर चढलेल्या सागर केरकर यांना दुर्दैवी अपघाताचा सामना करावा लागला. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचारांचा खर्च पेलणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान बनले होते.

अशा कठीण प्रसंगी समाजातील वेदना स्वतःच्या मानणारे माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले हे सागर केरकर यांच्या मदतीसाठी खंबीरपणे पुढे सरसावले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्रपरिवारासह विविध स्तरांवरील परिचितांना मदतीचे भावनिक आवाहन केले. त्यांच्या या हाकेला समाजातील दानशूर आणि संवेदनशील व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला.

सुशिल चौगुले यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांनी आर्थिक मदत करत सागर केरकर यांच्या उपचारासाठी मोलाचा आधार दिला आहे. विशेष म्हणजे मदतीचा हा ओघ अजूनही सुरू असून समाजातील माणुसकीचे दर्शन घडत आहे.

आपल्या अडचणीच्या काळात समाजातून मिळालेल्या या प्रेमळ आधाराबद्दल सागर केरकर यांनी भावूक होत सुशिल चौगुले तसेच मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

दरम्यान, एखाद्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याला उभारी देण्याची सुशिल चौगुले यांची कार्यतत्परता आणि समाजभान याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. “माणुसकी अजून जिवंत आहे,” याचा प्रत्यय त्यांच्या या उपक्रमातून आला असून त्यांनी अशीच सामाजिक सेवा अविरत सुरू ठेवावी, अशा शुभेच्छा नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles