सावंतवाडी : यशाला सलाम, कर्तृत्वाला मान आणि गुणवत्तेला सन्मान देण्याची परंपरा जपत सकल मराठा समाज सिंधुदुर्ग यांच्या वतीने दहावी-बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मांगिरीश बॅन्क्वेट हॉल (राजवाड्याच्या पाठीमागे, आरेकर खानावळीच्या बाजूला) येथे हा प्रेरणादायी सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
या सोहळ्यास कुडाळ-मालवणचे दमदार आमदार निलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब, युवराज लखमराजे भोंसले तसेच ज्येष्ठ नेते संदीप कुडतरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. यंदा दहावी व बारावी परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह, तर ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरविण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरताच हा गौरव मर्यादित नसून क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. अशा गौरव सोहळ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि समाजाशी असलेली बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी कार्यक्रमाच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे व कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
“गुणवंतांचा सन्मान म्हणजे केवळ व्यक्तीचा गौरव नव्हे; तो समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचा उत्सव असतो!”
या प्रेरणादायी सोहळ्यास मराठा समाजातील विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंतांच्या यशाचा जल्लोष साजरा करावा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गवडे तसेच सर्व सदस्य व आयोजकांनी केले आहे.


