सावंतवाडी : बांदा चेकपोस्टवर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक उघडकीस आली. या कारवाईत १२ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये १० लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार आणि विविध विदेशी मद्याच्या ५१६ बाटल्या जप्त करण्यात आल्या असून दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बांदा पोलीस ठाणे गु.र.नं. ००८०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५ (अ)(इ), ८१ व ८३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद पंडित पाटील (वय ३४) यांनी दिली आहे.
या प्रकरणी शुभम मुरलीधर बिरादार (वय २७), सध्या हेरंभ, देवणी (जि. लातूर) व मूळ रा. जमखंडी, ता. नालखी, जि. बिदर (कर्नाटक) आणि अजय विनायक सांगळे (वय २६), रा. आरवली, सखेले-खोलवाडी, ता. वेंगुर्ला यांना आरोपी करण्यात आले आहे.
दि. २८ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बांदा चेकपोस्ट येथे तपासणीदरम्यान आरोपींकडील एमएच १२ एसएफ १०५६ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कारमधून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान Old Monk, Oaksmith, Royal Challenge, Smirnoff, Magic Moments Vodka, Roman Vodka आणि Royal Stag या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या एकूण ५१६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १० लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कारही जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १२ लाख २२ हजार रुपये इतकी आहे.
आरोपींनी कोणताही वैध परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक (PN/1213) नाईक करीत आहेत.
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पंकज शिंदे, एएसआय नाईक, हेड कॉन्स्टेबल कांडर कर, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद पाटील व राजाराम कापसे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.



