अभिमानास्पद! – राज्यस्तरीय पॅरा गोलबॉल स्पर्धेत सिंधुदुर्गच्या विना जोशींची चमक! ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्तुत्य निवड.

सिंधुदुर्ग: उल्हासनगर, जि. ठाणे येथे दि. २५ ते २८ जून २०२६ दरम्यान झालेल्या २ री ज्युनियर व ६ वी सीनियर राज्यस्तरीय गोलबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये सिंधुदुर्गच्या कुडाळ,तेर्से बांबर्डे,येथील सौ. विना विनायक जोशी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय पॅरा गोलबॉल चॅम्पियनशिप २०२६ साठी थेट निवड मिळवली आहे.
ही राष्ट्रीय स्पर्धा दि. १० ते १३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे इंडियन ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन, दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय संघासाठी एका महिला खेळाडूची निवड होणे, हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली १० वर्षे कार्यरत असलेल्या,साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष रुपाली दिपक पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दृष्टीबाधित खेळाडूंना एकत्र आणून गोलबॉलचे प्रशिक्षण दिले.तसेच खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व राष्ट्रपती गिर्यारोहक पुरस्कार विजेत्या श्रीमती नेहा पावसकर यांचे २ जून व १९ जून रोजी मोलाचे मार्गदर्शन लाभले.

उल्हासनगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सिंधुदुर्गचा सीनियर साहस पुरुष संघ –
कर्णधार : विठ्ठल शिरोडकर
खेळाडू : जयद्रथ राऊळ, हरी गावंकर, सुरेश दामले
व्यवस्थापक : दीपक पाटील.

सीनियर महिला संघ –
कर्णधार : श्रुती पाटील
खेळाडू : राष्ट्रीय खेळाडू विना जोशी, प्रियांका सावंत, भारती पाटील
व्यवस्थापिका : रुपाली पाटील.
या दोन्ही संघानी चमकदार कामगिरी केली. यामुळेच राष्ट्रीय स्तरावर एक महिला खेळाडू गेली.
साहस प्रतिष्ठानतर्फे विना जोशी यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले असून, अयोध्या येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्व सिंधुदुर्ग वासियांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मदतीचे आवाहन –
दृष्टीबाधित खेळाडूंच्या सरावासाठी आवश्यक असलेला ‘गोलबॉल’ हा विशेष चेंडू जर्मनीमध्ये तयार केला जातो. त्याची किंमत सुमारे ₹१४,००० असून, तो खरेदी करण्यासाठी व दृष्टीबाधितांना गोलबॉल सराव दरम्यान सुरक्षेच्या साहित्य खरेदीसाठी साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग निधी संकलन करत आहे.
दृष्टीबाधित खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी इच्छुक दानशूर व्यक्ती, संस्था व समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली पाटील (संपर्क – ९६२३८८३७६५) यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles